सोलापूर : वाहतुकीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर एकूण चार ठिकाणी पादचारी पूल बांधण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे या पुलांच्या कामाला गती मिळण्याची चिन्हे आहेेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रस्ते, परिवहन, वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. महामार्ग क्र. 65 वर मडकी वस्ती,सोलापूर विद्यापीठ,लोंढे वस्ती जिल्हा परिषद शाळा आणि भिमानगर (उजनी ) आशा चार ठिकाणी पादचारी पूल होणार आहेत. त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना या पूलाचा प्राधान्याने वापर होणार असल्याने त्यांनाही दिलासा मिळणार आहे.
पुणे – सोलापूर महामार्गाचे चार पदरीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांचा वेग वाढला मात्र त्यामुळे नागरीकांना रस्ता ओलांडणे त्रासदायी ठरले होते. त्यात नियमितचे नागरीक व विद्यार्थी यांचे विशेषत्वाने हाल होत असत. शिवाय या मार्गावर वारंवार छोटे-मोठे अपघात होऊ लागल्याने नागरीकांची ओरड होत होती तसेच वाहतुकीलाही अडथळाही निर्माण होत होता. पादचारी पूलांच्या कामानंतर हे प्रश्न निकालात निघतील असे सांगितले जात आहे.