पुणे । पुणे-सोलापूर मार्गावरील लोणी कवडी पाट टोल नाका येथे थिनरच्या बॅरलने भरलेला ट्रकचा स्फोट झाला. हा ट्रक टोल नाक्याला धडकल्याने ट्रकचा स्फोट झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून, त्याने ट्रकमधून उडी मारल्याने बचावला आहे. ट्रक चालकाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास खाक झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला. या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
थिनरने भरलेला ट्रक सोलापूरवरून मुंबईला जात होता. बुधवारी पहाटे तीन वाजून 53 मिनिटाने ट्रक टोल नाक्याच्या कठड्याला जोरात धडकला. त्यामुळे थिनरच्या बॅरलने पेट घेतल्याने मोठा ब्लास्ट झाला. बॅरलचे स्फोट होत असल्यामुळे मोठी आग तयार झाली. व हवेमुळे आजूबाजूला पसरली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सकाळी 6.30 वाजेपर्यंत आग विजवण्याचे काम चालू होते. आगीत ट्रक पूर्ण जळून खाक झाला.