पुणे स्मार्ट सिटीकडून विद्यापीठात आणखी 275 सायकली पुरवणार

0

पुणे । पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) वतीने मोठ्या प्रमाणात सायकली या सेवेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. ओफो कंपनीच्या सहकार्याने 275 सायकली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उपलब्ध करण्याचे आणखी एक स्मार्ट पाऊल उचलण्यात आले आहे. सुरुवातीच्या 90 दिवसांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे.

ओफोचे मोबाईल अ‍ॅप वापरून ही सायकल ऑनलाईन लॉग इन करून अनलॉक करता येते. या सायकली मोफत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, सायकलचा वापर कुठे व कसा होत आहे याचा जीपीएसच्या माध्यमातून संपूर्णपणे मागोवा ठेवला जातो. ओफोच्या या सायकली सध्या केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातच वापरण्यासाठी देण्यात येत आहेत. सायकलींना विद्यापीठ आणि औंध परिसरात प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणपूरक असल्याने याचे स्वागत आणि कौतुक सर्वत्र केले जात आहे.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याने नागरिकांचा त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा वापरणार्‍या लोकांच्या प्रतिक्रियाही आम्ही घेत आहोत. झूमकार पेडलच्या सोबत ओफो सायकलचा आणखी एक पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करत असल्याचा आम्हाला आनंद वाटत आहे. प्रायोगिक तत्त्वावर 90 दिवस मोफत सेवा दिल्यानंतर मिळणार्‍या प्रतिसादानुसार पुढे नाममात्र शुल्कामध्ये ही सेवा देण्यात येईल. ओफोचे राजर्षी सहाय म्हणाले, पुणे स्मार्ट सिटीच्या सहकार्याने विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक आणि अभ्यागतांना सायकलींचा सोयीस्कर पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल पिवळ्या रंगातील या सायकली 24 तास वापरता याव्यात या दृष्टीने त्यांना डायनामो आणि लाईट हेदेखील बसवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे बनवण्यात आल्यामुळे या सायकली वजनाने हलक्या, मजबूत आणि चालवण्यास आनंददायी अशा आहेत, असे सहाय यांनी सांगितले.