डॉ. के. एच. संचेती यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान
पुणे । पुणे हे खर्या अर्थाने विद्वानांचे शहर आहे. परदेशात जिथे जिथे गेलो तिथे पुण्यातील विद्वान तरुण मला भेटले. सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय, या सारख्या सर्व स्थरात पुण्याने विद्वान दिले. त्यामुळे पुणे तिथे काय उणे ही उक्ती पुण्याने खरी ठरवली असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एक कार्यक्रमात सांगितले. पुण्यभूषण फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा 29 वा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ डॉ. के. एच. संचेती यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. सोन्याच्या फाळाने पुण्यभूमी नांगरणारी बालशिवाजी असलेले सन्मानचिन्ह, एक लाख रुपये, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील होते. त्याचबरोबर पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, डॉ. रघुनाथ माशलकर आदी उपस्थित होते. या वेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार्थी डॉ के.एच. संचिती यांना शाल, पगडी आणि धनादेश देऊन गौरविण्यात आले याबरोबर 6 जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्यात आला.
सैनिकांचा सन्मान
वसंत प्रसादे, मधुकर ताम्हस्कर, निरबहादूर गुरुंग, रामदास मोरे, अनिल लामखेडे, श्रीनिवास आचार्य आदी स्वातंत्र्य सैनिक, गोवामुक्ती सैनिक आणि सैन्यदलात सेवा करताना जखमी झालेल्या सैनिकांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. डॉ सतीश देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
पुण्यभूषण पुरस्काराचे महत्त्व वाढले
डॉ. संचेती यांना पुण्यभूषण पुरस्कार दिल्याने पुरस्काराचे महत्व वाढले आहे. विद्वान व्यक्तींनी दुसर्या विद्वान व्यक्तींचा सन्मान पुण्यात करणे ही दुर्मिळ गोष्ट असली तरी पुण्यभूषण फाउंडेशनने 29 वर्षे हा उपक्रम उत्तमरीत्या चालविला आहे. ज्या गावात आपण कार्यरत असतो, त्या गावाने दिलेला पुरस्कार महत्वाचा असतो. डॉ. संचेती यांचे कार्यही पुरस्काराच्या तोलामोलाचे आहे.. त्यांच्या हातून रुग्णसेवा घडो, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. यापुढेही पुणेकरांची आणि रुग्णांची सेवा करणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना डॉ. संचेती यांनी सांगितले. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर सुरेश धर्मावत (काका) यांनी आभार मानले.