पुणे होर्डिग दुर्घटनेप्रकरणी जाहिरात कंपनीच्या मालकास अटक

0

पुणे- पुण्यातील होर्डिंग दुर्घटने प्रकरणी कॅप्शन या जाहिरात कंपनीचे मालक अब्दुल रझाक मोहम्मद खालीद फकी यांना अटक करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. जाहिरात कंपनीने याआधी दुर्घटनेसाठी मध्य रेल्वे जबाबादार धरत हात वर केले होते. याआधी रेल्वे कर्मचारी पांडुरंग वनारे आणि संजय सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे. संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमधे लोहार म्हणून काम करतो. हे दोघे होर्डींग काढण्याचे काम करत होते. मात्र होर्डिंग वरुन कापण्याऐवजी त्यांनी खालून कापण्यास सुरुवात केली होती.

5 ऑक्टोबरला दुपारी जुना बाजार येथील मुख्य चौकात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला तर सात जण गंभीर जखमी झाले. मध्ये रेल्वेच्या जागेत रस्त्यालगत हे होर्डिंग उभारण्यात आले होते. मध्य रेल्वे प्रशासनाने यासाठी कॅप्शन या जाहिरात एजन्सीला दोषी ठरवले होते. कॅप्शन अॅडव्हर्टायझिंग कंपनीकडे या होर्डिंगचा ठेका होता. त्यांनी मात्र या दुर्घटनेसाठी मध्य रेल्वेच दोषी असल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी यापूर्वी मध्य रेल्वेशी हे होर्डिंग काढण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती पुरावा म्हणून सादर केले होते.

शुक्रवारी पुण्यातील जुना बाजार मुख्य चौकातील होर्डिंगचा लोखंडी सांगाडा काढताना तो सिग्नलसाठी उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर पडला होता. यात चार जणांना नाहक जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये तर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत.