पुणे :- नवीन संकल्पना व टीमवर्कने केलेल्या कामाच्या जोरावर पुण्यभूषण फाऊंडेशनने अनेक उपक्रम यशस्वी पार पडले असून त्यांचे जगभर अनुकरण झाले, असे प्रतिपादन ’पुण्यभूषण फाऊंडेशन’चे संस्थापक डॉ. सतीश देसाई यांनी केले. ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज‘ आणि ‘सिनर्जी फाऊंडेशन’ यांच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक योगदानाबद्दल डॉ. सतीश देसाई यांचा सत्कार मंगळवार, दि. 15 मे रोजी सायंकाळी करण्यात आला. ’सिनर्जी’चे संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, गणेश जाधव यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ पार पडला. एरंडवणे येथील ’सिनर्जी’च्या कार्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम झाला. ’सिनर्जी संवाद’ या उपक्रमातंर्गत झालेले हे दुसरे संवाद पुष्प होते.
सत्कारावेळी डॉ. सतीश देसाई यांनी ’पुण्यभूषणचे दिवस’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. स्वातंत्र्योत्तर पिढीच्या योगदानाची दखल घेण्यासाठी एस.एम.जोशी यांच्या प्रेरणेने ’पुण्यभूषण’ फाऊंडेशन’ ची स्थापना झाली. भीमसेन जोशी यांना हा पहिला ‘पुण्यभूषण ‘ पुरस्कार देण्यात आला होता. आता हा पुरस्कार जगद्विख्यात झाला असून, गावोगावी त्याचे अनुकरण सुरू आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी पुण्यभूषण कार्यक्रमाला आल्यावर त्यांच्या पुढाकाराने ’महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सुरू झाला. प्रास्ताविक दीपक बीडकर यांनी केले तर आभार राजेंद्र आवटे यांनी मानले.