पिंपरी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 293 व्या जयंतीनिमित्त मोरवाडी येथील त्यांच्या पुतळ्यास चिंचवड, अंजठानगर येथील पुण्यश्लोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास महानवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अशोक उकले, भाऊ उगडे, अशोक ठोंबरे, सचिन कोळेकर, औंदुबर सरक, राजू मारकड, सागर कोपनर, सागर पालवे, दादा मिसाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अहिल्याबाई न्यायदानासाठी प्रसिद्ध
यावेळी बोलताना विलास महानवर म्हणाले की, अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. त्यांचा जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
अहिल्याबाई एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला. अहिल्याबाई या उत्तम राज्यकर्त्या होत्या. त्यांच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्याबाईंनी रयतेचे मन जिंकले.