पुणे : पुणे शहरातील कचराकोंडी पालिका प्रशासन आणि स्थानिक नेत्यांच्या अपयशानंतर अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला यश आले आहे. फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीनंतर फुरसुंगी आणि उरळी देवाची ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे 23 दिवासांपासून निर्माण झालेल्या कचराकोंडीचा प्रश्न अखेर सुटला आहे. फडणवीस यांनी रविवारी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्र्यांनी कचरा प्रश्नावर तोडगा काढल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांचे आभार मानले आहेत.
गेल्या 23 दिवसांपासून पुणे शहरातील कचरा उरळी देवाची आणि फुरसुंगीमध्ये टाकू देणार नाही, अशी भूमिका तेथील ग्रामस्थांनी घेतली होती. स्थानिक नेते आणि पालिका प्रशासनाने अनेक ग्रामस्थांसोबत यासंदर्भात अनेक बैठकी घेतल्या. मात्र ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. अखेर रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. कचरा डेपो कायमचा बंद करावा, तसेच गावकर्यांच्या अन्य मागण्या एका महिन्यामध्ये पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.