बंगळूरू: पुण्याची गहुंजे स्टेडीयमची खेळपट्टी खराब नव्हती तर आव्हानात्मक होती, असा दावा भारतीय संघाचा सलामीवीर मुरली विजयने केला आहे. आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी पुण्यातील खेळपट्टीला खराब दर्जा दिला असला तरी विजयने मात्र त्या खेळपट्टीचे आश्चर्यकारक समर्थन केले आहे. येथे केला. पाटा स्वरुपाच्या खेळपट्टय़ांवर धावांची रास ओतण्याऐवजी फलंदाजांनी अशा खेळपट्टयांवर स्वतःला सिद्ध करायला हवे, अशी अपेक्षा त्याने याप्रसंगी केले. स्वतः विजय पुण्यातील त्या कसोटी लढतीत अनुक्रमे 10 व 2 धावा करू शकला होता.
फलंदाजांच्या तंत्रशुद्ध खेळाची कसोटी
‘पुण्यातील खेळपट्टी अजिबात खराब नव्हती. उलटपक्षी, अगदी पहिल्या चेंडूपासूनच ती आव्हानात्मक होती. एक क्रिकेटपटूच्या नात्याने, आम्हाला अशा खेळपट्टय़ांवर सातत्याने खेळत राहायला हवे. कारण, अशा वातावरणातच फलंदाजांच्या तंत्रशुद्ध खेळाची कसोटी लागत असते’, असे मुरली विजय यावेळी म्हणाला. पुण्यातील कसोटी अवघ्या तीन दिवसातच निकाली लागल्यानंतर व मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी नकारात्मक अहवाल दिल्यानंतर आता पुढील कसोटीत खेळपट्टी कशी असेल, हा कळीचा प्रश्न ठरत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर बेंगळूरमधील कसोटी चांगली असेल, अशी अपेक्षा विजयने यावेळी व्यक्त केली.
खराब क्षेत्ररक्षण देखील मारक
‘पुण्यातील कसोटीत आमच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 260 धावांमध्ये रोखत उत्तम सुरुवात केली होती. पण, पहिल्या डावाअखेर पिछाडीवर फेकले गेल्याने याचा संघाला मोठा फटका बसला. डीआरएसचा संघाला अद्याप अपेक्षित लाभ घेता आलेला नसून खराब क्षेत्ररक्षण देखील मारक ठरत आहे’, असे निरीक्षण त्याने नोंदवले. ‘पुण्यात नेमके काय चुकले, याचे विश्लेषण पूर्ण झाले असून आम्ही आता दुसऱ्या कसोटी सामन्यावर लक्ष केंद्रित केले आहे’, याचाही विजयने उल्लेख केला.
चुका सुधारण्याचा प्रयत्न
पुण्यातील पराभवनंतर टीमने आत्मचिंतन केले असून आता दुसर्या कसोटीत चुका सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे विजयने म्हटले आहे. पुण्यातील कसोटीत स्टीव्हन स्मिथचे झेल सुटले,. तसेच डीआरएस घेण्याचे निर्णयही अचूक ठरले नाहीत. ‘या सगळ्यांविषयी आम्ही चर्चा केली असून दुसर्या कसोटीत असे काही घडणार नाही, असा विश्वास त्याने व्यक्त केला. गचाळ फलंदाजीचा फटका अत्यंत सुमार फलंदाजी हेच पुण्यातील पराभवाचे प्रमुख कारण असल्याचे विजय मानतो.