पुण्याच्या किशोर धनकुडेकडून एव्हरेस्ट सर

0

पुणे। पुण्याच्या किशोर धनकुडे याने जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्टवर (8848 मीटर) तिरंगा फडकविला. 42 वर्षीय किशोरने 2014मध्ये चीनच्या बाजूने एव्हरेस्ट सर केला होता. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण बाजूने एव्हरेस्ट सर करणारा तो महाराष्ट्राचा पहिला गिर्यारोहक ठरला आहे. किशोर 10 एप्रिलला बेस कॅम्पला पोहोचला होता. यानंतर तेथील वातावरणाशी जुळवून घेत त्याने 15 मे रोजी एव्हरेस्ट समिटच्या दिशेने कूच केली. तो 17 मे रोजी कँप-3 ला, तर 18 मे रोजी साउथ कोलला पोहोचला. खरे तर 19 मे रोजीच किशोरचे समीट झाले असते. पण खराब वातावरणामुळे त्याने कॅम्प-4लाच राहण्याचा निर्णय घेतला. खरे तर हा धाडसी निर्णय होता. कारण कॅम्प-4लाही राहणे तसे आव्हानात्मकच असते. यानंतर 19 मे रोजी सायंकाळी किशोरसह त्याच्या टीमने आगेकूच करत त्याने एव्हरेस्टवर तिरंगा फडकविला.

किशोरसह इतर सहकार्‍यांचा सहभाग
किशोर हा नेपाळमधील सातोरी अ‍ॅडव्हेंचर कंपनी सोबत या मोहिमेसाठी गेला होता. त्याच्यासोबत मिंगमा तेन्झी शेर्पाही होता. किशोरसह ऑस्ट्रेलियाचा सॅम्युएल सीलेय, मुंबईचा ब्रीज शर्मा, इटलीचे अँजेलो, डेव्हिड हे गिर्यारोहकही होते. किशोर कॅम्प-4ला परतला असून, तो येथेच मुक्काम करील. रविवारी तो कॅम्प-2 ला पोहोचणार आणि सोमवारी (22 मे) बेस कॅम्पला पोहोचणार आहे. एव्हरेस्टच्या प्रवासात त्याला अनेक आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला. खराब वातावरणामुळे क्षणाक्षणाला तेथील परिस्थिती बदलत होती. मात्र, किशोरने धैर्याने सार्‍या परिस्थितीचा सामना केला आणि मोहीम यशस्वी करून दाखवली. किशोरने 2014मध्ये चीनच्या बाजूने एव्हरेस्ट सर केल्यानंतर 2015मध्ये तो नेपाळच्या बाजूने एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेला होता. मात्र, त्यावर्षी नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर त्या वर्षीची मोहीम रद्द करण्यात आली होती. गेल्या वर्षी किशोर महाराष्ट्रातील काही गिर्यारोहकांना बेस कॅम्पलाही घेऊन गेला होता, तर गेल्या वर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेड्स अल्ट्रा मॅरेथॉनही (90 किलोमीटर) पूर्ण केली होती. व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर असलेला किशोर गेल्या सात वर्षांपासून विविध मोहिमांमध्ये सहभागी होत आहे. या आधी त्याने सतोपंथ, कामेत या मोहिम यशस्वी केल्या आहेत. महाराष्ट्राचे इतरही गिर्यारोहक एव्हरेस्ट समीटसाठी रवाना झाले आहेत.