पुण्याच्या धर्तीवर पिंपरीतही सायकल शेअरिंग योजना

0

प्रशासनाच्या हालचाली; लवकरच महासभेसमोर धोरण

पिंपरी : पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका देखील सायकल शेअरिंग योजना सुरु करण्याचे नियोजन करत आहे. त्यासंदर्भातली पहिला बैठक गुरुवारी आयुक्त दालनात पार पडली. पुणे शहरात सायकल शेअरिंग योजना चालविणार्‍या सल्लागाराने सायकल शेअरिंग आराखड्याचे सादरीकरण केले. ‘नॉन मोटराईज ट्रान्सपोर्ट’ या गोंडस नावाखाली पालिका आराखडा तयार करण्याचा विचार करत आहे. तसेच याबाबतचे धोरण लवकरच महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवले जाणार आहे. मात्र त्यासाठी शहरात विविध ठिकाणी सायकल ट्रॅक तयार करण्यात यायला हवेत. आधीचे रस्ते तयापर करताना सायकल ट्रॅक बनविला नसल्यामुळे पुन्हा नवीन ट्रॅक बनवावे लागतील.

खासगी वाहनांच्या संख्येला आळा बसेल
पुणे महापालिकेने नुकतीच सायकल शेअरिंग योजना सुरु केली आहे. त्याला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर पिंपरी पालिका देखील सायकल शेअरिंग योजना सुरु करणार आहे. त्यासंदर्भातली पहिली बैठक आयुक्त दालनात पार पडली. पुण्यात सायकल आराखड्या तयार करणार्‍या सल्लागाराने आराखड्याचे पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर सादरीकरण केले. सायकल शेअरिंग योजना सुरु करण्याबाबत आयुक्त देखील सकारात्मक आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सायकल योजनेमुळे खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येला आळा बसण्याची शक्यता आहे. जवळच्या कामासाठी सायकलचा वापर केला जाऊ शकतो. पुणे महापालिकेने नुकतीच सायकल शेअरिंग योजना सुरु केली आहे. त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आधी सायकल ट्रॅक करावे लागतील
पिंपरी-चिंचवड शहराच्या बहुतांश भागात सायकल ट्रॅकचा पत्ता नाही. त्यामुळे पालिकेला अगोदर सायकल ट्रॅक तयार करावे लागणार आहेत. मोठ्या रस्त्याला सायकल ट्रॅक तयार केले आहेत. परंतु, त्याचा वापर होताना दिसत नाही. तसेच बीआरटी मार्गावर देखील सायकल ट्रॅक केले नाहीत. बीआरटीएस मार्गावर सायकल ट्रॅक करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. त्यासाठी अनुदानदेखील दिले आहे. परंतु पिंपरी पालिकेने बीआरटी मार्गावर सायकल ट्रॅक करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सायकल शेअरिंग योजना सुरु करण्याअगोदर पालिकेला सायकल ट्रॅक करावे लागणार आहेत.

मास्टर प्लॅन तयार
याबाबत माहिती देताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, नॉन मोटराईज ट्रान्सपोर्टसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचा विचार पालिका करत आहे. त्यात तीन गोष्टींचा विचार केला आहे. पादचारी मार्ग, पदपथ आणि पार्किंगचा विचार केला जाणार आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविण्यासाठी उपाययोजनाही केल्या जाणार आहेत. वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी फीडर रूटची निर्मिती करणे असा अभ्यास केला जाणार आहे. त्यानुसार मोबीलीटी आराखडा तयार केला जाणार आहे. यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. सायकल शेअरींग संदर्भात सादरीकरणही करण्यात आले.