पुण्याच्या निवडणूक रिंगणातून बापट बाद ?

0

पुणे : लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून भाजप आणि शिवसेनच्यावतीने पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे लोकसभा निवडणुकीतून बापट यांचा पत्ता कट झाला असे मानले जात आहे. युती झाल्यानंतर निवडणुकीतील जबाबदार्‍यांचे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात नुकतीच बैठक झाली. त्यात भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी पाच समन्वयक नेमण्यात आले. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, मावळ, बारामती, माढा आणि सोलापूर मतदार संघाचे समन्वयक म्हणून गिरीश बापट आणि शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहा मतदारसंघासाठी समन्वयक नेमल्याने बापट यांना प्रचार आढावा घेण्यास ऐन निवडणुकीत फिरावे लागणार आहे, याचा अर्थ असाही काढला जात आहे की बापट पुण्यात लोकसभेचे उमेदवार नसतील. भाजपमध्ये उमेदवारीसाठी विद्यमान खासदार अनिल शिरोळे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि बापट इच्छुक आहेत. नव्या नेमणुकीमुळे बापट शर्यतीतून बाद झाले आहेत. उरलेल्या तिघांमध्ये उमेदवार कोण याकडे लक्ष आहे. जुन्या नेत्यांना बाजूला करून नवा चेहरा दिला जाईल का ? त्यात नगरसेवक मुरली मोहोळ यांचे नांव घेतले जाते.