पुण्याच्या बाजारात दरवळणार कर्नाटक हापूसचा सुगंध

0

पुणे : कर्नाटक हापूसची आवक रविवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात रविवारी झाली. सुमारे दोन डझनच्या वीस पेट्यांची आवक झाली असून मार्केटयार्डातील व्यापार्‍यांनी पहिल्या पेटीचे पूजनदेखील केले. सध्या प्रती पेटीस 2 हजार 500 रुपये भाव मिळाल्याची माहिती खरेदीदार रावसाहेब कुंजीर यांनी दिली.

बागवान यांच्या गाळ्यावर पाहिली पेटी
गेल्या वर्षी 3 जानेवारीरोजी कर्नाटक हापूसचे आगमन पुणे मार्केटयार्डात झाले होते. मात्र तुलनेत यावर्षी तब्बल तीन आठवडे अगोदरच कर्नाटक हापूस दाखल झाला आहे. गतवर्षी चार डझनाच्या पेटीस 3500 रुपये भाव मिळाला होता. गेल्यावर्षीची तुलना करता यंदा पहिल्या पेटीला चांगला भाव मिळाला. मार्केटयार्डात नूर बागवान यांच्या गाळ्यावर ही पेटी दाखल झाली असून रावसाहेब कुंजीर यांनी हा आंबा खरेदी केला.

ओखीमुळे आंब्याचे नुकसान
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नियमित आवक सुरु होईल, असे कुंजीर यांनी सांगितले. यंदा कर्नाटकमध्ये आंब्याचा हंगाम चांगला होईल अशी अपेक्षा होती. मात्र ओखी वादळामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी हापूस जानेवारीत
कर्नाटक हापूसची पहिली पेटी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तीन आठवडे लवकर दाखल झाली आहे. मात्र जगप्रसिध्द रत्नागिरी हापूसच्या आगमनाची प्रतिक्षा अजून काही दिवस करावी लागणार आहे. रत्नागिरी हापूसची आवक जानेवारी महिन्यात तुरळकपणे सुरु होईल, असा अंदाज व्यापारी अरविंद मोरे यांनी व्यक्त केला आहे़