पुण्याच्या भाजपवर युतीची छाया

0
पुणे :  भाजप आणि शिवसेना युतीची बोलणी आता अंतिम टप्प्यात आली आहेत. या घडामोडींचा भाजपच्या पुण्यातील राजकारणावर थेट परिणाम होणार आहे. त्यातही सेनेपेक्षा भाजपच्या गोटात अधिक खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सहकार्याची गरज भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती होती आणि शिरोळे युतीचे उमेदवार होते, ते पाहता शिरोळे यांनी शिवसेनेबद्दल मांडलेले मत पक्षाच्या नेत्यांना विचारात घ्यावे लागेल. यावेळी मोदी लाट नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटना हा मित्रपक्ष भाजपला सोडून गेला आहे, दुसरीकडे काँग्रेस पक्ष हळूहळू जोर धरू लागला आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेची आवश्यकता विद्यमान खासदारांना वाटत असेल असे मानले जाते.
त्याचवेळी पुण्यातील आमदारांच्या मनात युती झाल्यास कोणत्या मतदारसंघावर गंडांतर येईल याची चिंता आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत भाजपचे आठ आमदार आहेत. कसबा, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेन्ट, वडगांव शेरी, कोथरुड, हडपसर आणि खडकवासला असे विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. भाजप आणि शिवसेना युती झाल्यास दोन किंवा तीन मतदारसंघ सेनेच्या वाट्याला जातील. शिवसेनेत महादेव बाबर ( हडपसर ), विनायक निम्हण ( शिवाजीनगर ) आणि चंद्रकांत मोकाटे ( कोथरूड ) असे तिघे इच्छुक असल्याचे बोलले जाते. याखेरीज पुणे कॅन्टोन्मेन्ट हा राखीव मतदारसंघ शिवसेना मागेल असेही सांगितले जाते. या चारपैकी कोणता मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाईल याकडे भाजपच्या आमदारांचे लक्ष राहील.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेना युती नव्हती. त्यामुळे आठही मतदारसंघ भाजपने लढविले आणि शंभर टक्के यश मिळविले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्यास आणि युती झाल्यास भाजपच्या दोन आमदारांना तरी ‘त्याग’ करावा लागेल.