पुण्याच्या मार्केट यार्डात बोरांची आवक वाढली

0

पुणे । ख्रिसमसमुळे शाळांना सुट्ट्या असल्याने तसेच नविन वर्षाचे औचित्य साधून नागरिकांची पर्यटनस्थळी गर्दी केली आहे. पर्यटकांकडून बोरांना मागणी वाढली असल्याने बोरांच्या दरात तब्बल 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्केटयार्डात सध्या चमेली, उमराण, चेकनट आणि चण्यामण्या बोरांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ रविवारी सर्व प्रकारच्या बोरांची मिळून तब्बल अडीच हजार गोणी इतकी आवक झाली आहे.

आवक 12 जानेवारीपर्यंत कायम
सोलापूर जिल्ह्यातील आष्टी, मोहोळ, कोनेरी, अनदर आदी परिसरातून आवक होत आहे. तसेच पुण्यातील बाजारातून महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई, गोवा, लोणावळा आदी परिसरातील व्यापार्‍यांकडून बोरांची खरेदी केली जात आहे. दरम्यान येत्या मंगळवारपासून संक्रातीनिमित्त बोरांना मागणी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच दरामध्येही आणखी दहा टक्के वाढ होईल असा अंदाज व्यापारी प्रविण शहा यांनी व्यक्त केला. तसेच वाढलेले दर आणि आवक 12 जानेवारीपर्यंत कायम राहिल. मात्र त्यानंतर संक्रातींसाठीची खरेदी बंद होईल आणि दरामध्येही घसरण होईल.

बोरांचा हंगाम 15 फेब्रुवारीपर्यंत : चमेलीला 10 किलोस 80-110 रु.
बोरांचा हंगाम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु झाला आहे. सध्या हंगाम बहरात असून आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे उत्पादनात तब्बल 10 ते 15 टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. बोरांचे उत्पादनही दर्जेदार आहे. सद्यस्थितीत बाजारात येणारी बोरे ही चवीला चांगली असल्याने ती ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. बोरांचा हंगाम 15 फेब्रुवारीवारी पर्यंत सुरु राहिल असा अंदाज आहे. घाऊक बाजारात चमेली बोरास दहा किलोस 80 ते 110 रुपये, उमराण बोरांना 35 ते 50 रुपये, चेकनट बोरास 280 ते 300 रुपये आणि चण्यामण्या बोरांना 350 ते 370 रुपये भाव मिळत आहे.