चिपळूण । चिपळून येथील जोशी मैदानात संपन्न झालेल्या महाराष्ट्र खो-खो असोसिएशन मान्यताप्राप्त, रोटरी क्लब चिपळूण व चिपळूण तालूका खो-खो असोसिएशन आयोजित 45 व्या कुमार व मुली (18 वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी आमदार चषक खो-खो स्पर्धेत. कुमार गटात सांगलीने विजेतेपदावर नाव कोरले तर मुलींमधे पुण्याने विजेतेपद कायम राखले. मुंबई उपनगरच्या कुमारांना व ठाण्याच्या मुलींना सलग दुसर्या वर्षी विजेतेपदाने हुलकावणी दिली. कुमार गटात सांगलीच्या प्रथमेश शेळकेने तर मुलींमधे पुण्याच्या प्रियांका इंगळेने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला. मुलींच्या अंतिम फेरीत गतविजेत्या पुणे संघाने अतिरिक्त डावापर्यंत खेचल्या गेलेल्या सामन्यात ठाण्याविरूद्ध (5-4,3-4,6-5) 14-13 अशी 1 गुण व 1.30 मि राखून बाजी मारली. नाणेफेक पुण्याने जिंकून संरक्षण स्वीकारले.
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके खालील प्रमाणे :
मुली गट:
सर्वोत्कृष्ट संरक्षक : कोमल दारवटकर (पुणे)
सर्वोत्कृष्ट आक्रमक : रेश्मा राठोड (ठाणे)
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू : प्रियांका इंगळे (पुणे)
कुमार गट :
सर्वोत्कृष्ट संरक्षक : सागर गायकवाड (सांगली)
सर्वोत्कृष्ट आक्रमक : ओमकार सोनावणे (मुंबई उपनगर)
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू : प्रथमेश शेळके ( सांगली).
अतिरिक्त डावात मिळवला विजय
मध्यंतराला असलेली एका गुणाची पिछाडी भरून काढत ठाण्याने दुसर्या डावात बरोबरी साधली. हि कोंडी फोडण्यासाठी अतिरिक्त डाव खेळवण्यात आला व या डावात पुण्याने उत्कृष्ट खेळकरून विजयश्री खेचून आणली. पुण्याच्या प्रियांका इंगळे (2.10 मि, 2.10मि , 1.10 मि व 6 गडी) , कोमल दारवटकर (1.40 मि, 3.10 मि व 2.20 मि व 2 गडी) व भाग्यश्री जाधव (2.20 मि, 1.20 मि व 2.30 मि) विजयाच्या शिल्पकार होत्या. ठाण्याच्या रेश्मा राठोडने (2.30 मि, 3.50 मि व 4 गडी) विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कुमार गटातील अंतिम सामन्यात उपांत्य फेरीत कमवलेला आत्मविश्वास कायम राखत सांगलीने मुंबई उपनगरचा (8-6,7-7) 15-13 असा 2 गुण व 4.10 मि राखून मात करून विजेतेपद पटकावले व आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. विजयी संघाच्या सौरभ अहिर (1.50 मि व 2.40 मि), प्रथमेश शेळके (1.10 मि, 1.30 मि व 3 गडी) , अभिषेक केरीवाले (1.10 मि, 1.30 मि व 4 गडी) व सागर गायकवाड (2 मि व 1.40 मि) यांनी संस्मरणीय खेळ केला. उपनगरच्या ओमकार सोनावणेने धारदार आक्रमणात 7 गडी टिपले.