शहराची लोकसंख्या 35 लाख, वाहने 36.20 लाख
आणखी दोन लाख 80 हजार वाहनांची नव्याने भर
पुणे : पुणे शहरात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, मार्च 2018 पर्यंत संपलेल्या आर्थिक वर्षात त्यात 2.80 लाख वाहनांची नव्याने भर पडली आहे. पुणे शहराची लोकसंख्या अंदाजे 35 लाख आहे, तर शहरातील वाहनांची संख्या आता 36 लाख 27 हजार इतकी झाली आहे. पुणे उपप्रादेशिक परिवहन खात्याच्या (आरटीओ) आकडेवारीतून ही भीषणता निदर्शनास आली आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्ते वाहनांनी गजबजून गेले असून, वाहतूककोंडीची समस्या उग्र झाली आहे. तद्वतच वाहने पार्किंगची समस्याही गंभीर बनली आहे.
एक वाहन, एक कुटुंब संकल्पना मोडित!
पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2018 पर्यंत पुण्यात दोन लाख 80 हजार वाहनांची नव्याने नोंदणी झाली असून, त्यात सर्वाधिक दुचाकी वाहनांची संख्या आहे. आतापर्यंत शहरात एकूण नोंदणी झालेल्या वाहनांची संख्या ही 36 लाख 27 हजार इतकी आहे. 2016-17 या वर्षापर्यंत ती 33 लाख 37 हजार इतकी होती. 2017च्या तुलनेत 5.89 लाख चारचाकी वाहनांहून ती संख्या आता 6.45 लाख इतकी झाली आहे. तर गतवर्षी 24.97 लाख असलेली दुचाकींची संख्या यावर्षी 27.3 लाखांवर पोहोचली आहे. या वाहनांची संख्या व शहराची लोकसंख्या पाहाता एक कुटुंब एक वाहन या संकल्पना मोडित निघाली असून, लोकसंख्येपेक्षा वाहने जास्त झाली आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी नवीन वाहने नोंदणीचे प्रमाण हे 9.57 टक्क्यांनी अधिक होते. सातत्याने वाढत जाणारी वाहनांची संख्या पाहाता, हे शहर लवकरच वाहतूककोंडी ग्रस्त होण्याची भीतीदेखील परिवहन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, शहराचे गॅस चेंबर होण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.