हडपसर : महाराष्ट्रातील पुणे हे मुंबईनंतर मोठे शहर म्हणून विकसित होत आहे, येथे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. पुणे शहर हे जागतिक दर्जाचे शहर बनविण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोंढवा येथे बोलताना व्यक्त केले. कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक मुरली मोहोळ, नगरसेवक संजय घुले, हडपसर भाजप अध्यक्ष सुभाष जंगले, सुनील धुमाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुणे हे महत्त्वाचे शहर…
मुख्यमंत्री पुढे म्हणाले ’ रस्ता होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, आमदार योगेश टिळेकर यांनी पाठपुरावा करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. नगरविकास मंत्री म्हणून पुणे महापालिकेला मी निर्देश दिले, मोठ्या संघर्षानंतर पुणे महानगरपालिकेने हा रस्ता मंजूर केला. सर्व प्रकारच्या व्यवस्था या रस्त्यात केल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. काम पूर्ण झाल्यावर पुण्यातील सर्वांत सुंदर रस्ता म्हणून या कात्रजकोंढवा रस्त्याकडे पाहण्यात येईल, पुणे हे महत्त्वाचे शहर मुंबईपाठोपाठ जागतिक दर्जाचे महत्त्वाचे शहर आहे. रस्त्याचे कामे मार्गी लावले.
आमदार योगेश टिळेकर यावेळी बोलताना म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले. वारंवार टेंडर काढले पण काम पूर्ण केले नाही. शिवसेनेचे नऊ नगरसेवक, माजी आमदार येथील नगरसेवक होते, पण येथील रस्त्याचे काम करू शकले नाहीत. आम्ही येथे सत्तेत आल्यावर रस्त्यासाठी पाठपुरावा केला तसेच रस्त्याचे काम मार्गी लागले. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल.
टिळेकरांचा मंत्रिमंडळात समावेश?
आमदार योगेश टिळेकर यांच्यावर अनेक प्रकरणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. कार्यक्रमात टिळेकर यांनी शक्तिप्रदर्शन करून आपणच पुन्हा आमदारकीसाठी दावेदार असल्याचे दाखवून दिले. टिळेकर यांचा आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री विचार करतील, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये रंगली आहे.