पुण्यातही पेट्रोलच्या मापात छेडछाड

0

पुणे । ठाण्यापाठोपाठ पुण्यातही पेट्रोलच्या मापात छेडछाड होत असल्याचे आढळून आले आहे. ठाण्यातील कारवाई दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे-अहमदनगर राज्य महामार्गावरील चंदननगर भागातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर कारवाई करत पंप सील केला आहे. पुण्यातील ही पहिलीच कारवाई आहे. मात्र पुण्यातील आणखी पेट्रोल पंपांबाबतही आपणाकडे माहिती असून तेथेही कारवाई होऊ शकते, असे पोलीस अधिकारी कल्याणराव करपे यांनी सांगितले आहे.

ठाण्यात इलेक्ट्रॉनिक चीपद्वारे पेट्रोलच्या मापात छेडछाड करणारा सूत्रधार प्रशांत नूलकर याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. ठाणे क्राईम ब्रांचने ही कारवाई केली. कर्नाटकमधील हुबळीमधून प्रशांतला ताब्यात घेतले. पेट्रोल वेन्डिंग मशिनमध्ये झालेल्या छेडछाडीमुळे ग्राहकाला 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी मिळायचे. म्हणजेच एका लिटरमागे जवळपास 20 मिलीलिटर इंधनाचा घोटाळा होत होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक सुरू आहे. चिपद्वारे होत असलेली पेट्रोलचोरी पकडण्यासाठी ठाणे क्राईम ब्रांचकडून राज्यभरात धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. मागील एक महिन्यात ठाण्यातील 98 पेट्रोलपंप सील करण्यात आली आहेत. ठाणे क्राईम ब्रांचने मे महिन्यात प्रशांत नूलकरचा साथीदार विवेक शेट्येला अटक केली होती. त्यानेच या चिप देशभरातील पेट्रोल पंपावर पुरवल्या आहेत. प्रशांत नूलकर आणि विवेक शेट्ये यांच्यासह ठाणे पोलिसांनी यापूर्वी सहा जणांना अटक केली आहे.