सामने खेळविण्याआधीच न्यायालयाची नोटीस
पुणे : पुण्यात क्रिकेट आयपीएलचे सामने लवकरच खेळवण्यात येणार आहेत. मात्र, हे सामने खेळवण्याआधी मैदानाच्या देखभालीसाठी पाणी वापरण्यात येईल. त्याचे नियोजन कसे करण्यात येणार आहे, याची माहिती द्या, अशी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला धाडली आहे. त्यामुळे सध्या तरी पुण्यातील आयपीएलच्या सामन्यांवर टांगती तलवार लटकलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असतानाच राज्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच कावेरी प्रश्नावरून तामिळनाडूत आयपीएलचे सामने खेळवण्यास विरोध झाल्यानंतर पुण्यात आयपीएलचे सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला उत्तर देण्यास सांगितले आहे.
सामन्यांसाठी पाणी आणणार कोठून?
कावेरी पाण्याच्या मुद्द्यावरून चेन्नई सुपर किंगच्या होम ग्राऊंडवर आंदोलन करण्यात आले होते. हा विषय पाहता कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनानंतर चेन्नईमधील सामने पुण्यात खेळविले जाणार आहेत. या सामन्यांबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनला न्यालायत काही प्रश्नांची उत्तरे मागितली. पुण्यातील मैदानावर क्रिकेटचे किती सामने होणार? मैदानासाठी किती पाणी लागणार असून, पाण्याची व्यवस्था कुठून करणार? ही माहिती न्यायालयात सादर करावी लागणार आहे. पुण्यातील आयपीएल सामान्यांसाठी वापरल्या जाणार्या पाण्याच्या विरोधात एका संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने ही माहिती मागविली आहे.
पुण्यातील सामने अडचणीत!
पुण्याला होणारा पाणीपुरवठा हा पवना नदीद्वारे केला जात आहे. पुण्याला पाण्याची झळ बसली असताना पुण्यातील मैदानांवर होणार्या आयपीएल सामन्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासणार आहे, असा मुद्दा याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. आयपीएल 2016 च्या मोसमात हीच याचिका मुंबईत होणार्या सामन्यांच्या संदर्भात दाखल करण्यात आली होती. ज्यात मुंबईतील सामने मुंबई बाहेर खेळविण्याची मागणी करण्यात आली होती. आता पुण्यातील सामन्याचा समावेशबद्दल सुनावणी घेण्यात आली.