चाकण : बेकायदेशीर व विनापरवाना सुरु असलेल्या गावठी ताडीच्या गुत्त्यावर येथील पोलिसांनी अचानक मारलेल्या छाप्यात चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीतील आरुवस्ती वरून पसतीस लिटरची गावठी दारू ताब्यात घेण्यात आली असून, याप्रकरणी गावातीलच एकावर शुक्रवारी (दि. ११ ऑगस्ट) रोजी रात्री गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व ठाणे अंमलदार चंद्रकांत गवारी यांनी दिली.
साहेबराव नर्सिंग भंडारी (वय ५७ वर्षे, रा. आरुवस्ती, खराबवाडी, ता. खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ताडी विक्रेत्याचे नाव आहे. चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संतोष व्ही. देव्हाडे (वय – ३८ वर्षे, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकण तळेगाव दाभाडे रस्त्यावरील खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीतील आरुवस्ती वर रस्त्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये आडोशाला भंडारी हा गेल्या काही दिवसांपासून कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता ताडीच्या दारूची या भागात विनापरवाना सर्रास विक्री करत होता. याबाबतची कुणकुण येथील पोलिसांना त्यांच्या एका गुप्त खबऱ्याकडून मिळाली असता चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष देव्हाडे, दत्तात्रय जाधव, प्रमोद भोसले आदि कर्मचाऱ्यांनी संबधित ठिकाणी सापळा लावला. शुक्रवारी अचानक मारलेल्या या छाप्यात पोलिसांनी ताडीची दारू ताब्यात घेतली.
चाकण पोलिसांनी या छाप्यात एकूण पसतीस लिटरची ताडी ताब्यात घेतली असून, भंडारी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खराबवाडी व या भागात गेल्या अनेक दिवसांपासून चोरून ताडी व हातभट्टीची दारू रातोरात विकली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. या परिसरात विनापरवाना व बेकायदेशीरपणे अवैध धंदे करणाऱ्यांवर आगामी काळात अशीच कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.