पुणे : चित्रपटांमध्ये विविध महाल, मंदिरे आणि जुन्या वाडयांचे सेट उभे केले जातात. त्याचे आम्हा कलाकारांना आणि रसिकांना देखील अप्रूप असे. मात्र, आता गणेशोत्सवात एकाहून एक सरस मंदिरांसह महालांचे हुबेहुब सेट गणेश मंडळांकडून उभारले जात आहेत. त्यामध्ये पुण्यातील राजाराम मंडळ अग्रभागी असून त्यामुळेच पुण्याच्या गणेशोत्सवात मला यायला आवडते, असे सांगत सिनेअभिनेते जितेंद्र यांनी पुणेकरांशी संवाद साधला.
विविध क्षेत्रातील व्यक्तिंचा सत्कार
सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळातर्फे यंदा 127 व्या वर्षानिमित्त दक्षिण भारतातील वेल्लूर येथील गोल्डन टेम्पलची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या प्रतिकृतीला भेट देण्यासोबत त्यांनी गणरायाची आरतीही केली. यावेळी सुहाना मसालेचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चोरडिया, बांधकाम व्यावसायिक नरेश वाधवानी, मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, उपाध्यक्ष अरुण गवळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक, क्रीडा, कला क्षेत्रातील कामगिरीबद्दल अमन विधाते, उदय जगताप, विनायक रासकर, आकाश गोरखा, शुभम काजळे, आर्य भिवपाठकी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मंडळाला सहकार्य करणार्यांना देखील गौरविण्यात आले.
गोल्डन टेम्पलची प्रतिकृती
दक्षिण भारतातील वेल्लूरची गोल्डन टेम्पलची प्रतिकृती प्रख्यात कलाकार अमन विधाते यांनी साकारली आहे. मंदिराची प्रतिकृती 72 फूट लांब, 34 फूट रुंद आणि 60 फूट उंच आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला कारंजे बसविण्यात आले असून प्रत्यक्ष वेल्लूर येथील मंदिरात आल्याचा भास भाविकांना होत आहे. मंदिरात आकर्षक झुंबर, शेकडो रंगीबेरंगी दिवे बसविण्यात आले असून आकर्षक विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे. पुणेकरांना आणि पुण्यात येणार्या गणेशभक्तांना त्या धार्मिक स्थळांचे याची देही याची डोळा दर्शन घेता यावे, याकरीता जशीच्या तशी संपूर्ण प्रतिकृती साकारली जाते, असेही त्यांनी सांगितले.