पुण्यातील गर्भवती महिलेला कोरोनाची लागण: डॉक्टरांसह 17 जण क्वारंटाइन

0

पुणे: ताप असल्याने महापालिकेच्या भवानीपेठ एका प्रसृतीगृहात आलेल्या गर्भवती महिलेला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांसह सुमारे 17 जणांना “क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. दरम्यान, या सर्वांची करोनाची तपासणी करण्यात आली असून, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुन्हा सात दिवसानंतर या सर्वांची करोनाची चाचणी केली जाणार आहे.

वारजे येथील ही पाच महिन्यांची गर्भवती सोनवणे रुग्णालयात दाखल झालेली होती. तिला ताप असल्याने रक्त तपासणीनंतर डॉक्‍टरांनी टायफॉइड झाल्याने उपचार सुरू केले होते. मात्र, महिलेची लक्षणे करोनासदृश वाटल्याने या महिलेच्या नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्या 3 आरएमओ, 9 नर्स,1 आया, 2 नर्सिंग ऑर्डली, तसेच 2 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या दवाखान्यात महापालिकेचे लहान मुलांचे आयसीयू सुरू होते. तसेच महापालिकेचे शहरातील प्रमुख प्रसूतीगृह आहे. मात्र, या ठिकाणी आता करोनाचा रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.