पुणे : जनता वसाहत मधील राममंदिराजवळील असणाऱ्या कालव्याच्या कडेला असलेला रस्ता धोकादायकपणे खचला आहे. रस्त्याच्या कालव्याच्या आतील बाजूस असणारी भिंत सुमारे 10 फूट कोसळली आहे. त्यामुळे कालव्याला लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळ्याही तुटून पडण्याच्या स्थितीत असून कालव्यात पाणी सोडल्यानंतर हा रस्ता खचून दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पर्वती पायथ्याला असलेल्या जनता वसाहतीसाठी कालव्याच्या बाजूला रस्ता आहे. त्याची महापालिकेकडून देखभाल व दुरुस्ती केली जाते. कालव्या लगतच हा रस्ता असल्याने त्या ठिकणी सुरक्षा जाळ्याही लावण्यात आलेल्या आहेत. या रस्त्याचे दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपासून हा रस्ता कालव्यात खचत असून रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. सध्या कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद असून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानंतर हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता आहे.
अपघाताचा धोका
जनता वसाहत मध्ये जाणारा हा वर्दळीचा रस्ता असल्याने त्याचा वापर दुचाकी चालक आणि पादचारी मोठ्या प्रमाणात करतात, त्यामुळे रस्ता अचानक खचल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसकडून या ठिकाणी बॅरिकेड लावून वर्दळ थांबविली असली तरी तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीन करण्यात येत आहे.