पुणे: ‘कोरोना’ संसर्गाच्या संभाव्य प्रादुर्भावाबरोबरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच ‘जम्बो कोविड केंद्रा’चे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. पिंपरी येथील आण्णासाहेब मगर क्रीडांगण, शिवाजी नगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) प्रांगण तसेच महाळुंगे-बालेवाडी स्टेडियम येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड केंद्राच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी अजित पवार यांनी केली.
‘जम्बो कोविड केंद्रा’ची उभारणी करताना दर्जेदार काम करण्यावर भर असला पाहिजे. ‘कोरोना’ संकटाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्यविषयक सर्व सोईसुविधा देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. गारपीट, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच रुग्णालय उभारणीचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
अण्णासाहेब मगर क्रीडांगण तसेच शिवाजी नगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओइपी ) प्रांगणात जम्बो कोविड केंद्र उभारणी करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली. यामध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचना, ऑक्सिजनयुक्त, आयसीयू खाटा, कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) असलेले सर्व सोयीसुविधा युक्त कोविड केंद्र उभारण्यात येत आहे.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे सभापती संतोषअण्णा लोंढे, सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, विरोधी पक्षनेता नाना काटे, विभागीय आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त उपायुक्त रुबल अग्रवाल, पिंपरी-चिंचवड महागनगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका वैशाली घोडेकर, नगरसेवक सर्वश्री योगेश बहल, संजोग वाघेरे, राजू मिसाळ, सचिन चिखले, अजित गव्हाणे, पंकज भालेकर, ‘जेस आयडियास’ कंपनीचे अजित ठक्कर, भावेश ठक्कर, अर्पित ठक्कर व शिवाजी नगर येथील जम्बो कोवीड केंद्र पाहणी दौऱ्याच्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, नगरसेवक बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.