पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये असुविधा; १०० पेक्षा अधिक डॉक्टरांचा राजीनामा

0

पुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. मात्र दोन आठवड्यातच या जम्बो कोविड सेंटरमधील अनागोदी कारभार समोर आला. असुविधा व अपुऱ्या औषधांच्या पुरवठ्यामुळे येथे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘लाईफलाईन’ या संस्थेकडे जम्बो कोविड सेंटरची जबाबदारी देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात लाईफलाईन या संस्थेला काम जमत नसेल तर दुसऱ्या संस्थांची नियुक्ती करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे महानगरपालिकेने लाईफलाईन या संस्थेकडून ‘ जम्बो’ची जबाबदारी काढून घेतली आहे. त्यामुळे या डॉक्टरांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. काल शनिवारपासून डॉक्टर आणि कर्मचारी राजीनामा देत आहेत. आज रविवारपर्यंत जवळपास शंभरहून अधिक डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

अनेक अपुऱ्या सुविधा, आणि प्रशासन व आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांमधील असमन्वयामुळे रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पालिका प्रशासन व राज्य सरकारवर टीका होऊ लागली आहे. पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर्स व रुग्णवाहिकांची कमतरता असल्याची कबुली देत अजित पवारांनी लाईफ लाईन संस्थेच्या कामकाजावर ताशेरे ओढत त्यांना जमत नसेल तर काम दुसऱ्याला देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्याप्रमाणे आता लाईफलाईनची जबाबदारी काढून घेतली आहे. त्यामुळे त्या संस्थेमार्फत आलेले सर्व डॉक्टर व कर्मचारी वर्ग आपापले राजीनामे देत आहे.

पुणे महापालिकेने डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्तीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत आत्तापर्यंत ५० च्या वर डॉक्टर आणि १३ मेडिकल पॅरारल स्टाफची नेमणूक केली आहे. ही संख्या वाढवण्यात येणार आहे असे देखील महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.