केंद्राकडून ५ तर राज्य सरकारने दिले ५ लाख
मुंबई:- फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर व चित्र प्रसिद्ध झाल्यामुळे उसळलेल्या दंगलीत पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनीअर मोहसीन शेख याचा मृत्यू झाला होता. काहीही चुकी नसलेल्या मोहसीनच्या मृत्युनंतर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारच्या वतीने त्याच्या परिवाराला १० लाख रुपयांची मदत घोषित केली आहे.
मोहसीनच्या परिवाराला मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या समितीच्या शिफारशीने शासनाकडे मागणी केली होती. या मागणीनंतर मोहसीनच्या परिवाराला मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यावर गुरुवारी शासन निर्णयाच्या अंतर्गत राज्य सरकारकडून ५ लाख तर केंद्र सरकारकडून ५ लाख अशी एकूण १० लाखाची रक्कम मोहसीनच्या परिवाराला देण्याची घोषणा केली आहे.
पुण्यात हडपसरमध्ये दोन जून २०१४ ला दंगल उसळली होती. यात सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या मोहसीन शेख याची हत्या झाली होती. त्याच्या हत्येप्रकरणी हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याच्यासह २० जणांना अटक केली होती. मोहसीनचा भाऊ मोबीन मोहंमद सादीक शेखने फिर्याद दिली होती. मोहसीनच्या वडिलांच्या मागणीनुसार २०१४ साली तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. मात्र नंतर निकम यांनी या खटल्यातून माघार घेतली होती. मोहसीनच्या मृत्यूनंतर विशेषता सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला गेला होता. आता सरकारकडून त्याच्या परिवाराला आर्थिक मदत घोषित झाली असली तरी या प्रकरणातील आरोपींना मात्र अजून शिक्षा झालेली नाही.