पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची महाराष्ट्रातील व्यूहरचना दोन दिवसात ठरणार आहे आणि त्याच सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीची बैठकही होणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने या घडामोडी निर्णायक असल्याने पुण्यातील नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष मुंबई, दिल्लीकडे लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आखणीमध्ये उत्तर प्रदेशाखालोखाल महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मंगळवारी रात्री मुंबईत आले आणि त्यांनी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. शहा यांच्या मुंबई मुक्कामात राज्यातील प्रत्येक मतदार संघाचा आढावा घेतला जाईल. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी याकरिता पुण्यात विद्यमान खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट आणि पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले असे तिघे इच्छुक आहेत. तिघांचेही समर्थक मुंबईतील शहा यांच्या दौऱ्याकडे लक्ष ठेवून आहेत. कदाचित भाजप आणि शिवसेना यांच्या युतीचे भवितव्यही शहा यांच्या मुंबई भेटीत स्पष्ट होईल. निवडणुका अगदी नजीक येऊन ठेपल्या असल्याने शिवसेनेची किती वाट पाह्यची याचे संकेत शहा देतील. दरम्यान पुण्यातील मेट्रो भूमीपूजनाच्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदरपूर्वक उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेशी जवळीक ठेवण्याचा इरादा असल्याचे सूचित केले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तसेच जागावाटपाचे सूत्र याच आठवड्यात ठरणार आहे. पुणे, नगर आणि गोंदिया अशा तीन मतदारसंघातील निर्णय महत्त्वाचे आहेत. पुण्यात काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. हा दावा खोडून काढत काँग्रेस पक्षातील इच्छुकांनी पुण्याची जागा काँग्रेसलाच मिळेल या विश्वासाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुणे शहर काँग्रेसने उमेदवारीकरीता आमदार अनंत गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड आणि काँग्रेस पक्षाचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांच्या नावांची शिफारस प्रदेश समितीकडे केली आहे. नगरमधील राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसच्या विखे पाटलांनी दावा केला आहे. भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने गोंदियातून निवडणूक लढविली होती. पटोलेंसाठी ही जागा काँग्रेस मागेल. त्यामुळे आघाडीत जागावाटप कसे राहील? याची उत्सुकता अर्थातच आहे.
अमित शहा यांच्या मुंबई भेटीत भाजपचे निवडणूक धोरण ठरणार असल्याने भाजपचा मित्र पक्ष शिवसेनाही सक्रीय होईल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा पंढरपूर दौरा दि. २४ रोजी होणार आहे. महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत असताना पंढरपूर दौऱ्याला राजकीय महत्त्व अधिकच आले आहे.