पुण्यातील भाजपचे नेतृत्व चंद्रकांत पाटलांकडे?

0

पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आपोआपच पुण्याच्या राजकारणात लक्ष घालतील आणि पुण्यात त्यांचे राजकीय महत्त्व वाढेल.विधानसभेवर निवडून आल्यानंतर पाटील यांनी दिवाळी भाऊबीज भेटीचा कार्यक्रम हाती घेतला आणि कोथरुड मतदारसंघातील दहा हजार गोरगरिब स्त्रीयांना साडी भेट दिली. मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी साडीवाटपाला विरोध केल्याने वाद निर्माण झाला. पण भाजपची यंत्रणा साडीवाटपात सहभागी करून घेण्यात पाटील यशस्वी ठरले. येत्या काही महिन्यात पुण्यात महापालिकेच्या पाच पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यातील उमेदवार ठरविण्यात पाटील यांच्या मताला महत्व येईल.पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे आता आमदार झाले आहेत, त्यामुळे नवा संचालक नेमण्याचा निर्णय भाजप घेईल, या मोठ्या नेमणुकीत पाटील यांचे मत विचारात घेतले जाईल. राज्यात मंत्रीपद मिळेलच पण पुण्याचे पालकमंत्रीपद मिळाले की पाटील अधिक पॉवरफुल होतील. शहर भाजपचे सत्ताकेंद्र पाटील यांच्या दिशेने सरकू लागेल.पुण्याचा पाणी पुरवठा, मेट्रो रेलप्रकल्प याकरिता जनमताचा दबाव भाजपवर वाढत जाईल, या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी मंत्री या नात्याने पाटील यांच्यावर येऊन पडेल. पुण्याच्या राजकारणात पाटील यांचा प्रवेश झाला आहे, मतदार संघातील घडामोडीत त्यांना ओघाने लक्ष घालावे लागणार आहे यामुळे आगामी काळात चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपचे नेतृत्व येईल, अशी दाट शक्यता आहे.