पुण्यातील भारती विद्यापीठामागे आढळला तरुणाचा मृतदेह

0

पुणे : भारती विद्यापीठ शैक्षणिक संस्थेच्या मागील बाजूला असलेल्या एका मोकळ्या मैदानात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असून प्राथमिक दर्शनी तरुणाची हत्या झाल्याचे दिसून येत आहे. आज गुरुवार (दि.२९) सकाळच्या सुमारास कचरा वेचक कामगार या परिसरात गेले असता हि घटना उघडकीस आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवार (दि.२९) रोजी सकाळच्या सुमारास कचरा कामगार भारती विद्यापीठ परिसरातील लेफ्ट डाऊन सोसायटी जवळील मोकळ्या जागेत गेले असता, त्यांना तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर कामगारांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे वय २५ ते ३० च्या दरम्यान असून तरुणाच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा असल्याने तसेच मृतदेहाची प्राथमिक तपासणी केली असता कोणताही पुरावा अथवा वस्तू जवळ नसल्याने हि हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच मृतदेह आढळलेल्या ठिकाणी मोकळी पडीक जागा असून जागोजागी कचरा साठलेला असल्याने डुकरांचे वास्तव्य देखील आहे. त्यामुळे मृतदेहाचे कान आणि चेहरा डुक्करांनी कुरतडल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मृतदेहाची ओळख पातळी नसून, ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सदरील तरुण हा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे का, की परिसरात वास्तव्य करणारा कोणी याचा देखील निष्कर्ष हाती आलेला नसून, हे प्रकरण सोडवणे आव्हानात्मक असल्याचे पोलीस बोलत आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोचलेले आहेत. याप्रकरणी अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडून करण्यात येत आहे.