पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहरात नोंदणीकृत वाहनांची संख्या 36 लाख 27 हजार 280 वर पोहोचली असून, त्यात दुचाकींची संख्या तब्बल 27 लाख 3 हजार 147 इतकी आहे. गेल्या वर्षभरात एकूण वाहनसंख्येत 2 लाख 89 हजार 910 वाहनांची भर पडली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी ही आकडेवारी जाहीर केली. दुचाकी वाहनांची संख्या 2016-17 मध्ये 24.97 लाख तर 2017-18 मध्ये 27.03 लाखाने वाढली आहे. चारचाकी वाहनांची नोंदणी 5.89 लाखांवरून 6.45 लाखांवर पोहोचली आहे. पुणे आरटीओच्या महसुलात 30 टक्क्यांनी वाढ होऊन मागील आर्थिक वर्षात महसूल 1,021.56 कोटींवर पोहोचला होता. र चारचाकी वाहनांच्या नोंदणीत 9.57 टक्के तर दुचाकीमध्ये 8.24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
टॅक्सी कॅबच्या संख्येत 5 हजार 648ने वाढ
टॅक्सी कॅब, रिक्षा, ट्रक, लॉरी आणि डिलिव्हरी व्हॅनची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. स्कूल बस, रूग्णवाहिका, खासगी बस, ट्रक, टँकर, ट्रॅक्टर, ट्रेलर, मालवाहू वाहनांची विक्री गेल्या वर्षीइतकीच झाली आहे. रिक्षांचे परवाने खुले केल्याने यावर्षी तब्बल 8 हजार 223 नवीन रिक्षा रस्त्यावर आल्या आहेत. आता शहरातील रिक्षांची संख्या 53 हजार 227 इतकी झाली. टॅक्सी कॅबच्या संख्येत 5 हजार 648ने वाढ झाली असून, त्यांची संख्या 28 हजार 344 झाली आहे. चारचाकी डिलिव्हरी व्हॅनची संख्या 4 हजार 353ने वाढून 47 हजार 135 आणि तीन चाकी डिलिव्हरी व्हॅनची संख्या 1 हजार 522ने वाढून 33 हजार 895 झाली आहे. ट्रक-लॉरीची संख्या 3 हजार 890 ने वाढून 38 हजार 598 वर पोहोचली आहे. स्कूल बसच्या संख्येत 283ने वाढ झाली असून, ते 2 हजार 564 झाली.
जिल्ह्याच्या एकूण महसुलात 27 टक्क्यांनी वाढ
प्रादेशिक परिवहन आधिकारी बाबासाहेब आजरी म्हणाले, वाढते औद्योगिकरण आणि टॅक्सी कॅबचे वाढती लोकप्रियता यामुळे टॅक्सी कॅबच्या टॅक्सी कॅबच्या संख्येत वाढ झाली आहे. व्यवसाय आणि शिक्षण यामुळे वाढत असलेली लोकसंख्या, वाढते आयटीक्षेत्र तसेच औद्योगिकरण यामुळे टॅक्सी कॅबची मागणी वाढू लागली आहे. कामानिमित्त जा-ये करणारे कर्मचारी आणि अन्य प्रवाशांमुळे टॅक्सी कॅबला मागणी वाढली आहे. रिक्षाच्या नोदंणीमध्ये केवळ 18 टक्के वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओच्या महसुलात 454.36 कोटीवरून 560.95 कोटी अशी वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या एकूण महसुलात 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑनलाईन पैसे भरण्याच्या सुविधेमुळेही आरटीओच्या महसुलात वाढ झाल्याचे आजरी यांनी सांगितले.