पुणे-पुणे व नागपूर शहरात रेशनिंगवर दुकानांमधून नागरिकांना टाटा ट्रस्टतर्फे उपलब्ध करून दिले जाणारे लोह व आयोडीनयुक्त मीठ मिळणार आहे. राज्य शानाने आज बुधवारी तसा निर्णय घेतला असून येत्या १ जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. हे मीठ शासनाला ११ रुपये प्रति किलो, तर नागरिकांना १४ रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध होणार आहे. अॅनिमिया आजाराचे महिला व मुलांमधील प्रमाण कमी करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत प्रायोगिक तत्वावर या दोन शहरात हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शासनाने म्हटले आहे.
२०१५-१६ साली चौथ्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील मुलांमध्ये ५३.८ टक्के, तर महिलांमध्ये ४८ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात अॅनिमिया असल्याचे दिसून आले. पुरेशा प्रमाणात आहारातून लोह व इतर पोषक द्रव्य दिल्यास अॅनिमिया नियंत्रणात येऊ शकतो. सद्यस्थितीत लोहयुक्त गोळ्या देऊन सरकारमार्फत प्रयत्न केले जातात. दरम्यान, टाटा ट्रस्टने लोह व आयोडीनयुक्त मीठ वितरणाचा प्रस्ताव शासनाला दिला होता. त्या प्रस्तावानुसार शासनाने प्रायोगिक तत्वावर पुणे व नागपूर शहरातील शिधापत्रिका धारकांना रेशनिंग दुकानांमार्फत हे मीठ वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर पुढील १२ महिने हे मीठ वितरित केले जाणार असून १४ रुपये प्रतिकिलो या दराने ते ग्राहकांना दिले जाणार आहे. प्रत्यक्षात शासनाला हे मीठ ११ रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध होणार आहे. रेशनिंग दुकानदारांना ते १२.५० प्रति किलो दराने दिले जाईल आणि ग्राहकांना ते १४ रुपये दराने मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार आहे. दरम्यान, गुणवत्तापूर्व मीठ पुरवठा करण्याची जबाबदारी टाटा ट्रस्टची राहणार आहे.