पुण्यातील शेकडो इमारती आग प्रतिबंधक सुरक्षेविना!

0

पुणे : इमारती बांधकाम करताना व ते पूर्ण झाल्यानंतर आग प्रतिबंधक सुरक्षेची तपासणी करणे तसेच अग्निरोधक यंत्रणा बसविणे बंधनकारक असते. मात्र, अनेक बांधकाम व्यावसायिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आज शहरात अशा शेकडो इमारती आहेत, ज्यांच्या आग प्रतिबंधक सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. फ्लॅटच्या किंमती कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी साधलेला हा शॉर्टकट भविष्यात नागरिकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. ही गंभीर बाब नॅशनल सोसायटी फॉर क्लीन स्टडीज या संस्थेने उघड केली आहे. संस्थेने यासंबंधीचे पत्र थेट मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांनाच पाठवून यास महापालिकेचा बांधकाम विभाग आणि अग्निशामक दलाचे अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच हा प्रकार गंभीर असून, त्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असल्याचेही म्हटले आहे.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
आग प्रतिबंधक तपासणीशिवाय इमारतींच्या बांधकामांना सुरुवात करता येत नाही. तसेच इमारत पूर्ण झाल्यावरही ही तपासणी केल्याशिवाय बांधकाम व्यावसायिकांना विक्री करता येत नाही. मात्र, पुणे शहरात अशा प्रकारची कोणतीही तपासणी न करता खुलेआम इमारतींचे इमले बांधले जात आहेत. शिवाय, ग्राहाकांना नव्या फ्लॅटची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. याकडे महापालिकेचा बांधकाम विभाग तसेच अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनीही दुर्लक्ष चालविल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.

तपासणी यंत्रणाच नाही!
पुणे महापालिकेकडे इमारतींची आग प्रतिबंधक तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रणाच नसल्याचे महापालिका प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. तसेच शहरातील अशा असंख्य नव्या बांधकामांची तपासणी करण्यासाठी महापालिकेकडे आवश्यक असणारा प्रशिक्षित कर्मचारीवर्गही नाही. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे अवघे 500 कर्मचारी असून, मागील 10 वर्षांपासून 500 पदे रिक्त आहेत. ही गंभीर बाब सामाजिक कार्यकर्ते, तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एनएससीसीच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे आग लागल्यास संपूर्ण सभागृह 3 मिनिटांत रिकामे करता आले पाहिजे. परंतु, पुणे शहरात अशी अनेक सभागृह आहेत जेथे असा प्रसंग ओढावल्यास सभागृह 3 मिनीटात रिकामे करणे केवळ अशक्य आहे. यासंदर्भात पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले की, बालगंधर्व रंगमंदिर सोडल्यास शहरातील सर्व सभागृहे सुरक्षित असून, अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित आहे. बालगंधर्व रंगमंदीर हे खुप जुने सभागृह आहे. येथेही आधुनिक अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आम्ही संबंधितांना सांगितले आहे.

अनेक इमारती असुरक्षित
शहरात अशा शेकडो इमारती आहेत ज्यांची आग प्रतिबंधक तपसणी झालेली नाही किंवा अग्निरोधक यंत्रणाच नाही. यामध्ये रहिवासी सोसायट्यांचा तसेच वाणिज्य संकुलांचाही समावेश आहे. अनेक इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्रणा केवळ शोभेसाठीच लावल्याचे दिसून येते. कारण ही उपकरणे कालबाह्य झालेली आहेत. अशा इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास मोठा बिकट प्रसंग उद्भवू शकतो.

…तर गुन्हा दाखल होऊ शकतो!
15 मीटरपेक्षा जास्त उंची असणार्‍या इमारतींना अग्निरोधक यंत्रणेची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र अग्निरोधक आणि जीवन सुरक्षा कायदा 2006 नुसार ज्या सोसायट्यांनी, व्यापारी संकुले आणि मालकांनी आग प्रतिबंधक उपकरणे इमारतीमध्ये ठेवली नसल्यास अशा इमारतींचे पाणी आणि वीज तोडण्याचा अधिकार अग्निशमन दलास आहे. तसेच अशा लोकांवर गुन्हाही दाखल होऊ शकतो.
– प्रशांत रणपिसे, अग्निशमन दलप्रमुख, पुणे महापालिका