पुणे: विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. उमेदवारही जवळपास निश्चित आहे, केवळ घोषणा शिल्लक आहे. दरम्यान पुण्यातील आघाडीच्या जागांबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. जिल्ह्यातील ८ पैकी ४ मतदारसंघ राष्ट्रवादीकडे, ३ मतदारसंघ कॉंग्रेसकडे तर एक मतदारसंघ मित्र पक्षासाठी राखीव ठेवण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
पुण्यातील हडपसर, पर्वती, वडगाव शेरी, खडकवासला हे चार विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी लढणार आहे. शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोनमेंट हे तीन मतदारसंघ कॉंग्रेससाठी सोडण्यात आल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. ज्या ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार असतील त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे असे आदेशही अजित पवारांनी दिले आहे.
यावेळी बोलताना अजित पवारांनी अमित शहांवर जोरदार टीका केली. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या मुद्द्याचा भाजप राजकीय वापर करत आहे. ३७० शी महाराष्ट्राचा काय संबंध? असा प्रश्न देखील अजित पवारांनी केला.