पुणे-पुण्यातील तब्बल १२ नामांकित हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर शनिवारी मध्यरात्रीनंतर पुणे गुन्हे आणि आर्थिक शाखेच्या पोलीसांनी छापा टाकला. नियमांचा भंग करीत रात्री उशीरापर्यंत हॉटेल्स सुरु असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पुणे शहरातील कोरेगाव पार्क, मुंढवा आणि चतुश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील ‘डेली ऑल डे’, ‘द बार स्टॉक एक्सचेंज’, ‘वायकी’, ‘नाईट राईडर’, ‘नाईट स्काय’, ‘वेस्टीन’, ‘पेंटाहाऊस’, ‘हार्डरॉक’, ‘ओकवूड लाँज’, ‘ब्ल्यू शॅक’, ‘मयामी जे. डब्ल्यू मेरिएट या हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या हॉटेल्सविरोधात स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली. शनिवारी रात्री १ वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. या हॉटेल्स आणि हुक्का पार्लर्सवर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. यामधील एकूण १२ हॉटेल्सपैकी ५ स्टार हॉटेल्सचा समावेश आहे. कारवाईच्या वेळी या सर्व हॉटेल्स आणि हुक्का पार्लरमध्ये मिळून ५ ते ७ हजार तरुण आणि तरुणी उपस्थित होते. पुणे पोलिसांनी अचानक केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.