सहल, देवदर्शनाहून परतताना कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बस कोसळली; पिरंगुट, बालेवाडी येथील वरखडे, केदारी, नागरे कुटुंबीयांवर काळाचा घाला
पुणे : 26 जानेवारी व त्याला जोडून आलेल्या शनिवार, रविवार या सुटीच्या निमित्ताने एका खासगी बसने कोकण व कोल्हापूरच्या सहल व देवदर्शनासाठी गेलेल्या केदारी, वरखडे व नागरे या एकाच कुटुंबातील सदस्यांना कोल्हापूर येथे झालेल्या बस दुर्घटनेत बसचालकासह 13 जणांना जलसमाधी मिळाली. पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावरुन त्यांची मिनी बस (क्रमांक-एमएच-12 एनएक्स 8550) नदीत कोसळ्याने हा दुर्देवी प्रकार घडला. तीन महिला या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. शुक्रवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गणपतीपुळे येथून देवदर्शन करुन कोल्हापूरमार्गे पुण्याकडे येताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुण्यातील पिरंगुट, बालेवाडी येथील हे तीन कुटुंब आहेत.
मोबाईल हॅण्डसेटच्या उजेडात शोधकार्य
पुलाचा संरक्षक दगडी कठडा तोडून बस 100 फूट खोल खाली कोसळली. जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिस प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले होते. एकाच कुटुंबातील 17 जण या बसमधून प्रवास करीत होते. अपघाताची माहिती समजताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. शनिवारी पहाटे बस बाहेर काढण्यात अग्निशमनच्या जवानांना यश आले. याठिकाणी असलेल्या काही नागरिकांनी हा अपघात पहिल्यानंतर, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले. सकाळी आठपर्यंत हे मदत कार्य अविरतपणे सुरु होते. घटनास्थळी अंधार असल्याने शोधकार्य करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. परिसरातील स्थानिक नागरिकांनी, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोबाईल हॅण्डसेटच्या उजेडात शोधकार्य सुरु केले. नदीपात्रात पाणी जास्त असल्याने बचावकार्यासाठी बोटीची आवश्यकता होती. मात्र, बोट वेळेत उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. परिसरातील काही स्थानिक नागरिक आणि तरुणांनी पाण्यात उड्या घेऊन एकेकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अजूनही एक सहा महिन्याचे बालक बेपत्ता असून, जीवन ज्योती आणि व्हाईट आर्मी यांच्या बोटींच्या मदतीने त्याचा उशीरापर्यंत शोध घेण्यात येत होता.
…आणि कुटुंबच संपले!
केदारी कुटुंबातील बाराजण शुक्रवारी पहाटे गणपतीपुळ्याला गेले होते. सचिन भरत केदारी यांच्या आराध्य या मुलाच्या जन्माचा नवस फेडण्यासाठी हे कुटुंब गेले होते. सोबत बहीण छाया नांगरे आणि मनीषा वरखडे यांचेही कुटुंबीयही सहभागी होते. गणपतीपुळे येथे दर्शन घेऊन सर्व कुटुंबीय कोल्हापूरच्या दिशेने परतीच्या मार्गाला लागले होते. कोल्हापूरमध्ये प्रवेश करताना पंचगंगा पुलावरून जात असताना त्यांच्या मिनी बसला अपघात झाला. या अपघातात सर्व कुटुंबाला प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे पुण्यातील बालेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांच्या या निधनामुळे त्यांच्या आप्तस्वकीयांनी हंबरडा फोडला.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहा÷य्यता निधीतून 5 लाख रूपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. रात्री घडलेल्या या अपघातानंतर चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहाणी केली.
बापलेकींवर मुळा नदीकाठी अंत्यसंस्कार
पौड : वरखडे कुटुंबातील वडील आणि दोन मुलींवर मुळा नदी किनारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेत बालेवाडी येथील संतोष वरखडे हे आपली पत्नी, दोन मुली तसेच बालेवाडी येथील मेहुणे सचिन केदारी व त्यांचे कुटुंबीय, तसेच नागरे कुटुंबीयातील त्यांची मेहुणी व त्यांची दोन मुले आणि बसचालकासह एकूण 16 जणांना घेऊन शुक्रवारी देवदर्शनाला गेले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले अंबडवेट येथील संतोष वरखडे व त्यांच्या दोन मुली गौरी आणि ज्ञानेश्वरी यांचे मृतदेह कोल्हापूर येथे शवविच्छेदन करून दुपारी दीडच्या सुमारास अंबडवेट येथे आणण्यात आले. या बाप-लेकींवर मुळा नदीकाठी दुपारी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील एकाच वेळी तिघांवर अंत्यसंस्कार करताना उपस्थितांचे डोळे पाणावले. संतोष वरखडे हे साप्ताहिक श्वासचे संपादक व पत्रकार विजय वरखडे यांचे मोठे बंधू होत.
अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणारे प्रवासी :
(पिरंगुट, ता. मुळशी येथील रहिवासी)
1) मनिषा संतोष वरखडे (वय 38) : जखमी
2) संतोष बबनराव वरखडे (वय 45) : मृत
3) गौरी संतोष वरखडे (वय 15) : मृत
4) ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (वय 14) : मृत
(बालेवाडी, ता. हवेली येथील रहिवासी)
5) मंदा भरत केदारी (वय 50) : जखमी
6) सचिन भरत केदारी (वय 34) : मृत
7) निलम सचिन केदारी (वय 28) : मृत
8) संकृती सचिन केदारी (वय 8) : मृत
9) सानिध्य सचिन केदारी (वय 9 महिने) : मृत
10) भावना दिलीप केदारी (वय 35) : मृत
11) साहिल दिलीप केदारी (वय 14) : मृत
12) श्रावणी दिलीप केदारी (वय 11) : मृत
13) छाया दिनेश नागरे (वय 41) : मृत
14) प्राजक्ता दिनेश नागरे (वय 18) : जखमी
15) प्रतिक दिनेश नागरे (वय 14) : मृत
16) वाहन चालक (वय 28) : मृत