पुण्यातील 4 हजार दत्तभक्त करणार घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण

0

पुणे । सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित लोकमंगल वर्धक घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण 4 हजार दत्तभक्त करणार आहेत. कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात रविवारी 26 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे कार्यकारी विश्‍वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बाळासाहेब गायकवाड, शिरीष मोहिते, चंद्रशेखर हलवाई, अ‍ॅड. एन. डी. पाटील, युवराज गाडवे, उल्हास कदम, तेजसदादा तराणेकर आदी उपस्थित होते.

दत्तजयंती उत्सवाची सुरुवात 29 नोव्हेंबरला होणार आहे. सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात डॉ. रामचंद्र देखणे यांचा भारुड हा कार्यक्रम होईल. 30 नोव्हेंबरला दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात 101 महिलांद्वारे रुद्रपठण आणि विश्‍वस्त उल्हास व कल्याणी कदम यांच्या हस्ते सकाळी 7 वाजता रुद्राभिषेक होणार आहे. तर, सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात नातं तुझं माझं हा हर्षित अभिराज यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते श्री गुरुमहात्म दिनदर्शिका प्रकाशन होईल. 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान दुपारी 1 ते रात्री साडेआठ यावेळेत मंदिरासमोरील उत्सवमंडपात भजन, कीर्तन, प्रवचन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच 3 डिसेंबरला दत्तजयंतीनिमित्त सकाळी 6.30 वाजता दत्तयाग होईल. दुपारी 12 वाजता बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हणमंतराव गायकवाड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. सायंकाळी 5 वाजून 57 मिनीटांनी दत्तजन्म सोहळा पार पडेल. सायंकाळी 7 वाजता पालखी नगरप्रदक्षिणा सोहळा होणार आहे.

सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
दत्तमंदिरातील सर्व दिवे व विद्युत उपकरणे सौर उर्जेवर सुरू करण्याकरीता तब्बल 25 किलोवॅट सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. याचे उद्घाटन 2 डिसेंबरला सकाळी 10 वाजता मंदिरासमोरील उत्सव मंडपात होणार आहे. यावेळी माजी उर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील, महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणचे अध्यक्ष किशोर शिंदे, ग्रामीणचे व्यवस्थापक विकास रोडे, एमएसईबीचे मुख्य अभियंता एम.जी.शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.

गुरुमहात्म पुरस्कार सोहळा
यावर्षीच्या दत्तजयंती सप्ताहाची सुरुवात मंत्रपठणाने होणार आहे. यावेळी प.पू. बाबामहाराज तराणेकर, नगरसेवक हेमंत रासने तसेच दत्तमंदिर ट्रस्टच्या विश्‍वस्तांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. यंदाचा गुरुमहात्म पुरस्कार प्रदान सोहळा 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री गिरीश बापट, धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टचे प्रमुख विश्‍वस्त विकास वालावलकर, विश्‍वास नांगरे पाटील आणि ज्येष्ठ ह्रदयशल्य विशारद डॉ. रणजीत जगताप यांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.