पुण्यातून उमेदवारीसाठी भाजपमध्ये चौघे इच्छुक

0

पुणे : आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी खासदार संजय काकडे यांनी दाखविल्याने भारतीय जनता पक्षात पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची संख्या चार इतकी झाली आहे.

पुण्यातून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले काकडे सध्या राज्यसभेचे सदस्य असून भाजपशी संलग्न आहेत. एका अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमात त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखविली.

पुणे महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत भाजपला प्रथमच बहुमत मिळाले. तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून नगरसेवक, माजी नगरसेवक काकडे यांनी भाजपमध्ये आणले. भाजपनेही त्या पक्षांतर मोहीमेला प्रतिसाद म्हणून बहुतेकांना उमेदवारी दिली. यामुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला. विजयाचे मोठे श्रेय काकडेंना दिले गेले. सध्या किमान ४० नगरसेवक काकडे समर्थक मानले जातात.

भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत विद्यमान खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले या तिघांची नांवे आहेत. गेल्या वर्षी दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित करून बापट यांनी लोकसभा तयारीला प्रारंभ केला आहे. बापट यांची पक्षावर भक्कम पकड आहे, पुण्यात मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या उमेदवारीची दखल काँग्रेस पक्षाने घेतली आहे. सहज भेटणारे सुसंस्कृत खासदार अशी शिरोळे यांची इमेज आहे.पंतप्रधान मोदी यांच्या योजना राबविण्यात घेतलेला पुढाकार हे शिरोळे यांचे बलस्थान मानले जाते. अध्यक्ष या नात्याने दमदारपणे केलेले संघटन ही गोगावले यांची जमेची बाजू आहें. यातून भाजपचा उमेदवार ठरविला जाणार आहे. भाजप गोटात प्रत्येक इच्छुका विषयी अंदाज बांधले जातात पण प्रतिक्रिया दिली जात नाही.