पुण्यातून लोकसभेसाठी मोहन जोशी आग्रही!

0

पुणे । लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याचे माजी आमदार मोहन जोशी मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत सांगून, निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. प्रदेश काँग्रेसने लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून, पुण्यात काँग्रेसची परिस्थिती कशी आहे, याचा विधानसभानिहाय आढावा नुकताच वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमवेत पुण्यातील प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर लोकसभा व विधानसभेच्या दावेदारीवरून शहरात सद्या चांगलाच खल सुरु झाला आहे.

या बैठकीला गत लोकसभा निवडणुकीतील उमेदवार विश्‍वजित कदमही उपस्थित होते. मात्र, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे विश्‍वजित आपली राजकीय कारकीर्द सांगलीतून सुरू करतील, असा सूर यावेळी उमटला. त्यात पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक असले तरी भाजपची लाट, पुण्यात भाजपची असलेली एकहाती सत्ता, याचा अंदाज घेण्यात घेऊनच उमेदवार ठरविण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्यात येणार असल्याने काँग्रेसकडून देण्यात येणार उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसने पसंती देणे आवश्यक बनले आहे. पुणे शहरात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक असल्याने काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत, अशी माहितीही काँग्रेस सूत्राने दिली.

रमेश बागवे पुन्हा नशीब अजमाविणार
लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर काँग्रेसची परिस्थिती कशी असेल, याचाही अंदाज यावेळी घेण्यात आला आहे. त्यात विधानसभेला आघाडी झाली तर काय स्थिती असेल, याची चाचपणी घेण्यात आली. कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे इच्छुक आहेत. काँग्रेसची ताकद कसबा आणि शिवाजीनगरमध्ये चांगली असल्याचा सूर या वेळी निघाला. त्यानंतर काँग्रेस पर्वती आणि कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघांवरही दावा करण्याची शक्यता आहे. कॅन्टोमेंटमधून माजी मंत्री आणि शहराध्यक्ष रमेश बागवे पुन्हा आपले नशीब अजमावतील, असा सूर काढण्यात आला. प्रदेश काँग्रेसने मुंबईत गेले तीन दिवस बैठकांचे आयोजन करून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या बैठकांसाठी ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत ठाण मांडले होते. पुणे लोकसभा मतदारसंघांच्या चर्चेसाठी पुण्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, माजी उपमहापौर आबा बागूल, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.