पुण्यात आजीबाईने प्रामाणिकपणे अडीच लाख रुपये केले परत

0

पुणे – सध्याच्या युगात प्रामाणिकपणा ही गोष्ट खूप दुर्मीळ होत चालली आहे. पण एका ६५ वर्षीय आजीचा प्रामाणिकपणा पाहिल्यावर तुम्हालाही अजब वाटेल. आजीबाईने चक्क २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज असलेली एका प्रवाशाची बॅग परत केली आहे. या प्रामाणिकपणामुळे आजीबाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजीबाईने नजरचुकीने बस स्थानकात शेजारील प्रवाशाची बॅग उचलत बसमधून प्रवास सुरु केला. परंतु काही वेळाने या आजीबाईच्या लक्षात आले की, चुकून दुसऱ्या प्रवाशाची बॅग आपण उचलली आहे.

त्यानंतर आजीबाईने क्षणाचाही विचार न करता एसटी बस थांबवित पुन्हा नारायणगाव गाठले. झालेला प्रकार बसस्थानकावरील पोलिसांना सांगत, आपल्याकडे आलेली बॅग पोलिसांकडे सुपूर्त केली. सिंधू सखाराम पडवळ (वय ६५, रा. म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) असे त्या प्रामाणिक आजीबाईचे नाव आहे. पोलिसांनी ती बॅग जेव्हा तपासली तेव्हा त्यात सोन्याचे दागिने, तीन मोबाईल व रोख रक्कम असा २ लाख ५० हजारांचा ऐवज असल्याचे निदर्शनास आले. जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील शितल राहुल पंडीत (रा. दौंड) या आपल्या वडीलांसह दौंड येथे जाण्यासाठी नारायणगाव एसटी बस स्टॅण्डवर आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ बॅग होती.

या बॅगेत ७ तोळे सोन्याचे दागिने, ३ मोबाईल व काही रोख रक्कम होती. काही वेळाने बॅग कोणीतरी चोरून नेल्याचे शितल यांच्या लक्षात आले. त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याशी संपर्क करीत बॅगेची चोरी झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब बस स्थानकावर धाव घेत स्थानकासह आजूबाजूचा परिसर पिंजून काढीत बॅगेचा शोध सुरू केला. त्याच वेळी बस स्थानकावर एका ६५ वर्षाच्या आजीबाईंनी बॅग आणून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर घटनेची खात्री करून बॅगेतील सर्व दागिने, मोबाईल, पैसे असा किमती ऐवज असलेली बॅग नारायणगाव पोलिसांनी शितल पंडित यांना परत केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी आजीबाईचे कौतुक करत त्यांचा सन्मान केला.