पुणे : शहरात स्वाईन फ्लुने थैमान घातले असून, पुन्हा चार रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. एकूण मृत रूग्णांची संख्या 80 वर पोहोचली आहे. अजून तब्बल 11 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, स्वाईन फ्लुबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता, शहरात चिंतेचे वातावरण आहे. कधी ऊन, तर कधी पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने शहरात दमट वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण स्वाईन फ्लुच्या विषाणूंसाठी पोषक ठरत असून, त्यामुळे एच1 एन1 बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
एकूण मृत रुग्णांची संख्या 80
स्वाईन फ्लुने दगावलेल्या 4 रुग्णांपैकी एक 96 वर्षीय रुग्ण आहे. हे रुग्ण वानोरीचे राहणारे असून, 27 जुलैरोजी त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमूने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले होते. दुसर्या दिवशी त्यांना स्वाईन फ्लु असल्याचे निदान झाले. मात्र उपचारादरम्यान एका रुग्णाचा 29 जुलैरोजी मृत्यू झाला. तसेच अहमदनगर जिल्ह्यातून उपचारासाठी पुण्यात आलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यूदेखील 29 जुलैरोजी झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. 19 जुलैरोजी या रुग्णाच्या घशातील स्त्रावाचे नमूने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. उशिरा उपचार मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. तसेच बुधवारपेठेत राहणार्या 52 वर्षीय रुग्णाचा 30 जुलैरोजी व सातारा येथे राहणार्या 44 वर्षीय रुग्णाचा 31 जुलैरोजी मृत्यू झाला. त्यामुळे आता शहरात स्वाईन फ्लुने दगावलेल्या रुग्णांची संख्या 80 वर पोहोचली आहे.
111 रुग्णांना टॅमिफ्लु
शहरात स्वाईन फ्लुचा प्रभाव वाढला असून, सोमवारी तब्बल 111 रुग्णांना टॅमिफ्लु औषध देण्यात आले आहे. त्यापैकी 6 रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत विविध रुग्णालयांमध्ये 22 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.