पुण्यात आता पाऊण तासात कोरोना बाधित रुग्णांचा मिळणार अहवाल

0
  • पुणे : कोरोनाबाधित, संशयित रुग्णांचे तातडीने निदान व्हावे या दृष्टीने उपयुक्त ठरणारी रॅपिड अँटिजेन किट पुणे महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आजपासून टप्प्याटप्प्याने या किटद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे पाऊण तासात रुग्णाचा अहवाल प्राप्त होणार आहे.

महापालिकेने एक लाख किटची खरेदी केली असून त्याद्वारे एक लाख नागरिकांची तपासणी होणार आहे. शहरात कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिके कडून विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या दृष्टीने चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी रॅपिड अँटिजेन किटची खरेदी करण्यात आली आहे.

या किटद्वारे तपासणी केल्यानंतर पाऊण तासात त्याबाबतचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचे वेळेवर निदान करता येणे शक्य होणार असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. अँटिजेन चाचणीमुळे करोनाबाबतचे शहरातील चित्र बदलण्याची शक्यता आहे. करोना स्वॅब चाचण्यांसाठी मोठय़ा प्रमाणावर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, ससून रुग्णालय प्रयोगशाळा आणि खासगी प्रयोगशाळा यांच्यावर अवलंबून राहावे लागत होते. अँटिजेन चाचण्या सुरू केल्याने हे अवलंबित्व कमी होईल.