पुण्यात आयटी इंजिनियर तरुणीची आत्महत्या

0

पुणे । पुण्यामधील मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका आयटी इंजिनियर तरुणीने आत्महत्या केली आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. अश्‍विनी पांडरंगराव गवारे (वय 22, रा. चंदननगर, धर्मनगर, मुळ रा. विठ्ठलवाडी, शिरूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. यामुळे तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सातव्या मजल्यावरून मारली उडी
अश्‍विनी गवारे ही आयटी इंजिनियर असून, ती मुंढव्यातील ग्लोबल टायलेंट ट्रॅक या कंपनीमध्ये गेल्या चार महिन्यांपासून टेली काउन्सिलिंगचे प्रशिक्षण घेत होती. सात दिवसांपासून ती कंपनीमध्ये प्रशिक्षणाला आली नव्हती. मात्र सोमवारी सकाळी ती कामावर आली. काही वेळ काम केल्यानंतर तिने अचानक सातव्या मजल्यावरील बाल्कनीमधून उडी मारली. ती खाली पडताच मोठ्याने आवाज झाल्याने एकच खळबळ उडाली. कर्मचार्‍यांनी तात्काळ मुंढवा पोलिसांना कळवले. त्यानंतर अश्‍विनीला एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेची माहिती अश्‍विनीच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक अनिल पाथरूडकर यांनी दिली. गेल्याच आठवड्यात एका आयटी इंजिनियरने त्याच्या कुटुंबीयांसोबत आत्महत्या केली. त्यापूर्वी पुणे विद्यापीठातील एका तरुणीने प्रेमभंगातून आत्महत्या केली. यामुळे उच्चशिक्षितांमध्ये मानसिक तणावातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.