पुणे : पुण्यात कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ब्रेमेन चौकाकडून पुणे विद्यापीठाकडे जाणारी भरधाव कार दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या टेम्पोवर आदळली. या अपघातात दोघांचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्री या अपघाताची घटना घडली. प्रतीक शेट्टीवार (वय २९), राहुल नायर (वय २८) अशी मृतांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, राहुल आणि प्रतीक हे मूळचे केरळचे असून, ते आणि इतर दोघे कारमधून ब्रेमेन चौकाकडून पुणे विद्यापीठाच्या दिशेने जात होते. चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकावरून विरुद्ध दिशेने समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरवर आदळली. त्यानंतर इतर दोन वाहनांनाही धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील चौघे गंभीर जखमी झाले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच, चतुःश्रुंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.