पुणे-दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा आज मंगळवार दुसरा दिवस आहे. पुण्यातील हडपसर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोकूळ दुधाचा टँकर फोडला. काल सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच अमरावती येथे स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर फोडून दूध रस्त्यावर ओतले होते. काही ठिकाणी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या होत्या.
मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा त्यामागे हेतू होता. पण अद्यापपर्यंत तरी स्वाभिमानला त्यात यश आलेले दिसत नाही. कारण मंगळवारी मुंबईत कुठेही दूधाची टंचाई जाणवली नाही. मुंबईत दुधाचा पुरवठा सुरळीत सुरु आहे. मुंबईत दुधाच्या गाडया फोडण्याचे किंवा दूध ओतून देण्याचे प्रकार कुठे घडू नयेत यासाठी पोलिसांनी मुंबईच्या प्रवेशद्वारापासून ते दूध केंद्रापर्यंत प्रत्येक गाडीला संरक्षण दिले होते.