वाकड – चिकन विक्रेत्याने दोन ग्राहकांना वेगवेगळ्या दराने चिकन दिल्याचा जाब विचारणाऱ्या ग्राहकावर चिकन विक्रेत्याने कोंबडी कापण्याच्या सत्तूर’ने हल्ला केल्याची घटना पुनावळे मध्ये उघडकीस आली आहे. विक्रेत्याने हल्ला केलेला ग्राहक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर विक्रेत्याविरोधात हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश ढवळे असे जखमी ग्राहकाचे नाव आहे. तर अजीज शेख असे हल्लेखोर चिकन विक्रेत्याचे नाव आहे. निलेश ढवळे हा ग्राहक अजीज शेख कामाला असलेल्या दुकानात चिकन घेण्यासाठी गेला होता. तेव्हा अजीजने एका ग्राहकाकडून चिकन’चे ३१० रुपये घेतले, तर तेवढ्याच वजनाच्या चिकनसाठी निलेश ढवळे याच्याकडून मात्र ४१० रुपये घेतल्याचा जाब निलेशने अजीज’ला विचारला असता, दोघांमध्ये बाचाबाची होऊन, त्याचे पर्यवसान मारामारीत झाले.
यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत निलेश ढवळे या ग्राहकाकडून दुकानातील काही अंडी आणि वजनाचा काटा फुटला असता, चिडलेल्या अजिजने हातातील कोंबड्या कापायच्या सत्तूरने निलेशच्या डोक्यात गंभीर वार केले. यामध्ये निलेश जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत, तर आरोपी अजीजला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
एकूणच अशाप्रकारे मांसाहाराचे पदार्थ विक्री करणाऱ्या सर्वच विक्रेत्यांकडे धारदार हत्यारे असतात. त्यांचा तो व्यवसाय असल्याने पोलीस देखील त्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र अशा घटनांमुळे पोलिसांनी अशा विक्रेत्यांमध्ये कोणी गुन्हेगारी वृत्तीचे व्यक्ती काम करत असतील, तर त्यांच्यावर वेळीच जरब बसवल्यास भविष्यातील मोठे गुन्हे रोखण्यात यश येऊ शकते.