पुणे : मुबलक पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात पाणीकपातीचे सावट पडले असून सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे असा संघर्ष उभा राहिला आहे.
दिवाळी सणाच्या तोंडावर भाजपने पाणीकपात केली. त्यावेळी लोकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. खुद्द भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनीच पाणीकपाती विरोधात उपोषणाचा इशारा दिला. जलसंपदा खात्याने दैनंदिन पाणी पुरवठ्यात २०० एमएलडी एवढी कपात केली. ही कपात रद्द करावी अन्यथा भाजपच्या पुण्यातील आठही आमदारांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केली. कपातीपूर्वी पुण्याला १३५० एमएलडी एवढा पाणीपुरवठा होतो त्यात वाढ करावी अशी मागणी भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्य मंत्र्यांकडे केली. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान पालकमंत्री गिरीश बापट वारंवार पाणी कपात सूचित करत आले आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा पाणीकपातीचे सूतोवाच केले आहे. त्यावर शहरात प्रतिक्रिया उमटू लागल्या असून पाणी विषयावर महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडे वाढीव पाण्याची मागणी करावी याकरिता रेटा निर्माण झाला आहे.
हे देखील वाचा
धरणांतून पुण्याला १८ टीएमसीपेक्षा जास्त पाणी मिळावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने मंत्र्यांच्या दबावाखाली काम करू नये असाही इशारा दिला आहे. पुण्याला हक्काचे पाणी मिळावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा माजी आमदार जोशी यांनी पुन्हा दिला आहे. काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी तर पाणीकपातीच्या निषेधार्थ शनिवारी लाक्षणिक उपोषणही केले. पुण्याच्या महापालिकेतही पाणीप्रश्नावरून पडसाद उमटले आहेत.
भाजपचे माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनीही पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर त्यांनी टीका केली असून इगो जपण्यासाठी हे अधिकारी चाळीस लाख पुणेकरांना त्रास देत आहेत अशी टीका या तिघांनी केली आहे. सन २०१० पूर्वी पुण्याला जो कोटा मंजूर करण्यात आला आहे तो पुन्हा नव्याने मंजूर करून घेण्याची गरज नाही असे स्पष्ट असतानाही जलसंपदा विभागाचे प्राधिकरण मंजूर कोट्यापेक्षा कमी पाणी घ्यावे असे कसे काय सांगते? असा सवाल करण्यात आला आहे. त्याचवेळी महापालिका आयुक्तांनी लोकायुक्तांकडे दाद मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.