पुणे । जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेच्या पाणी वापरात साडेसहा टीएमसी पाणीकपात करावी, असा आदेश दिल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी महापालिकेसमोर हंडा आंदोलन केले. पाणीकपात कराल तर याद राखा.. ! असा इशारा शिवसेनेने दिला.पुण्यात जास्त पाणी वापरले जात असल्यामुळे शेतीला पाणी कमी मिळत असल्याची तक्रार काही शेतकर्यांनी जलसंपदा विभागाकडे केली होती. तक्रारीच्या सुनावणीनंतर या विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांनी महापालिकेने पाण्यात साडेसहा टीएमसी पाणीकपात करावी, असा आदेश दिला. या विरोधात शिवसेनेने महापालिकेसमोर आंदोलन केले.
तीव्र आंदोलनाचा इशारा
शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने हंडा घेऊन महापालिकेच्या मुख्य इमारती जवळ जमा झाल्या होत्या. प्रशासनच्या या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला. या आदोलनाचे नेतृत्व शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी केले. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढीव पाण्याची मागणी करणार
पाणी कपातीचे आदेश दिल्यानंतरही आम्ही पुण्यात पाणीकपात होऊ देणार नाही. या उलट 11 गावांचा समावेश केल्यामुळे वाढीव पाण्याची मागणी करणार आहोत. त्यासाठी मंत्र्यांसमवेत मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. तथापि पाण्याचा कोटा राज्य सरकारने ठरवून दिला असल्यामुळे त्यात कोणाला बदल करता येणार नाही, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे भविष्यात पाण्यावरून पुन्हा राजकारण पेटणार असे दिसत आहे.