मुंबई : पुणे महापालिका हद्दीमध्ये प्रतिमाणसी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे ऑडिट करणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली. महापालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून सोडणे, मुठा नदी जुन्या कालव्याचे अस्तरीकरण, मुळशी धरणातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करणे याबाबत प्राधान्याने विचार करण्यात येईल असेही रणजित पाटील विधानसभेत सांगितले. दौंडचे आमदार राहूल कुल यांनी पुणे महापालिकेच्या वतीने सांडपाणी शुद्ध करून कालव्यात सोडण्याविषयी अर्धातासांची चर्चा उपस्थित केली होती.
राहुल कुल म्हणाले, दौंड, इंदापूर हवेली, तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागासाठी खडकवासाला प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. प्रकल्पातील ५ टीएमची पाणी पुणे शहरासाठी देण्याचे नियोजन असताना, वाढत्या लोकसंख्येनुसार त्यात वाढ करून ११.५ टीएमसी पाणी शहरास देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी हे अधिकचे साडे सहा टीएमसी पाणी प्रक्रिया करून शेतीसाठी मूळ प्रकल्पाला देण्याचे ठरले होते. त्यानुसार मुंढवा जॅकवेल मधून जुन्या कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. मात्र अवघे तीन टीएमसी पाणी सोडण्यात येत असून, ते पाणी दूषित आहे. कालव्याला अस्तरीकरण नसल्याने हे पाणी शेवटपर्यंत पोचत नाही. शहराचा पाणीवापर १८ टीएमसीपर्यंत वाढला असून, प्रतिमाणसी ३०० लिटर्स पाणी वापरण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शहरांसाठी मुळशी धरणातून पाणी उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार बाबुराव पाचर्णे यांनी जुन्या कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी दूषित आहे. अस्तरीकरण नसल्याने झिरपणाऱ्या पाण्यामुळे हवेली तालुक्यातील कालव्यालगतच्या गावांमधील पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने नदीकाठच्या गावांना पाणी शुद्धीकरण यंत्रणा (आरो) दिली आहे. त्याप्रमाणे कालव्या काठाच्या गावांसाठीही अशी यंत्रणा द्यावी, कालव्याचे अस्तरीकरण तातडीने करावे अशी मागणी केली.
यावर उत्तर देताना रणजित पाटील म्हणाले, पुणे, पिंपरीचिंचवड महापालिका, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड, शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीतून प्रक्रिया ना करता मुळा मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोडावे याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात येतील. करारानुसार साडे सहा टीएमसी पाणी प्रक्रिया करून शेतीसाठी देणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक ती पाणी उपसा यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येईल. हे पाणी शेवटपर्यंत जाण्यासाठी कालव्याचे अस्तरीकरण आणि पंपांची क्षमता वाढविण्याचे काम करण्यात येईल. पुणे शहरात प्रतिमाणसी १३५ लिटर ऐवजी ३०० लिटर पाणी वापराण्यात येत असल्याबद्दल पाण्याचे ऑडिटिंग करण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले.