पुणे : तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षात भावनिक मुद्दे बाजूला पडले असून पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवायला हव्यात असा मतप्रवाह जोर धरत असून गेल्या दोन, तीन आठवड्यापासून पुण्यात विकासकामे गतीने चालू आहेत.
राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राम मंदिर, हनुमान यांची जात हे मुद्दे जोरकसपणे मांडण्यात येत होते. भाजपसाठी हा विषय फायद्याचा ठरला नाहीच उलट त्यांना तिथे सत्ता सोडावी लागली. राहुल गांधींचे गोत्र काय? हाही विषय चर्चेत होता. त्यातून भाजपचा प्रचार भरकटला. त्याचवेळी काँग्रेसने विकासाचे काय? हा मुद्दा लावून धरला होता. सातत्याने चांगला कारभार करणारे अशी प्रतिमा असलेले रमणसिंग, शिवराजसिंग चौहान असे भक्कम मुख्यमंत्री असतानाही तिथे भाजप पराभूत झाला. या निकालांमुळे भाजप पुन्हा विकासाच्या मुद्द्यांकडे वळले असावे याचे प्रत्यंतर पुण्यात येत आहे.
हे देखील वाचा
पुण्यात एकामागोमाग एक विकासकामांचे निर्णय होऊ लागले आहेत. भाजपने त्याचा प्रचारही चालू केला आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळच्या भाषणात काँग्रेस पक्षावरील टीका-टिपण्णी टाळून मोदी यांनी विकास कामांवर भर दिला. मोदी यांचा बदललेला सूर राजकीय नेत्यांनाही जाणवला. त्याची चर्चाही झाली. येत्या वर्षभरात बारा किलोमीटर अंतरापर्यंत मेट्रो रेल्वे धावू लागेल असे आश्वासन मोदी यांनी दिले. मेट्रोची कामे वेगाने चालू असल्याचे दिसत असल्याने पुणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. २०२१ साल हे मेट्रो साठीच्या मुदतीचे वर्ष आहे. मात्र, त्यापूर्वीच एकतीस किलोमीटरपर्यंत मेट्रो धावेल असा विश्वास मेट्रो च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शहराच्या मध्यवस्तीतील अती जलद मार्गाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी चालना दिली आहे. शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी या अती जलद मार्गाचा उपयोग होणार आहे त्यामुळे त्याचे स्वागत झाले आहे. १९८७ साली या मार्गाचा आराखडा तयार झाला होता. मात्र, भाजपने या मार्गाला चालना दिली आणि स्वाभाविकपणे याचे श्रेय आता भाजपला मिळेल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठीच्या भूसंपादनाचे सर्व अडथळे दूर केले आहेत. कोथरुड, पाषाण या परिसरात त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. लोहगांव विमानतळाच्या विस्तारिकरणासाठी संरक्षण खात्याची जादा जमीनही मिळवून देण्याचा निर्णय गडकरी यांनी घेतलेल्या बैठकीत झाला आहे. पीएमपीच्या बस ताफ्यात आणखी पाचशे गाड्यांची भर लौकरच पडणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विदेशी तंत्रज्ञान वापरून औंध, बाणेर, बालेवाडी भागात रस्ते सफाईची कामे करण्यात येणार आहेत त्याच्या सर्व चाचण्याही पूर्ण झाल्या.
गेल्या पंधरा, वीस दिवसात या कामांनी गती घेतलेली आहे. विकासाच्या कामातील त्रुटी विरोधी पक्षांनी दाखविल्या असल्या तरी मूळ योजनांना विरोध न करता मूक पाठिंबा दिला आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेली ही कामे यापूर्वीच पूर्ण करता आली असती. पण, आघाडी सरकारने अनास्थाच दाखविली त्याचा फायदा आता भाजपला मिळत आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.